पेडन्यूज प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी प्रथमच निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहिले. त्यांच्या वतीने माजी अॅडव्होकेट जनरल पाराशरन यांनी तब्बल तीन तास युक्तिवाद केला. सुनावणीची प्रक्रिया सोमवारी (दि. १६) पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माजी राज्यमंत्री व २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील चव्हाण यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांनी पेडन्यूज, तसेच कायद्यातील तरतुदींनुसार निवडणूक खर्च दाखल न केल्याप्रकरणी चव्हाणांविरुद्ध आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर सुनावणी सुरू आहे. गुरुवार व शुक्रवारच्या कामकाजात चव्हाण यांच्या वतीने नामांकित विधिज्ञांनी बचाव केला व तक्रारकर्त्यांचे आक्षेप फेटाळून लावले.
सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार आयोगापुढे सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस हे प्रकरण चालले. आता चव्हाण यांच्या वतीने मांडलेल्या मुद्यांचा तक्रारकर्त्यांना खुलासा करता यावा, या साठी सोमवारी (दि. १६) वेळ दिला असून त्यानंतर सुनावणी प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
आयोगासमोर ४ वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. आजवर झालेल्या प्रत्येक सुनावणीला तक्रारकर्ते डॉ. किन्हाळकर प्रत्यक्ष हजर राहिले. पण चव्हाण यांनी ही केस वकिलांवर सोपवून आयोगापुढे येण्याचे कटाक्षाने टाळले होते. परंतु शुक्रवारी त्री-सदस्यीय आयोगापुढे सुनावणी सुरू झाली, तेव्हा दालनात चव्हाण हजर झाले. डॉ. किन्हाळकरही तेथे हजर होते. मात्र, दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही, असे सांगण्यात आले. आयोगासमोर, तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी आजवर अनेक नाामांकित विधिज्ञांनी हजेरी लावली. अंतिम टप्प्यात त्यांनी आणखी एका वरिष्ठ विधिज्ञास पाचारण करून आपली बाजू मांडली. या प्रकरणी आयोगाचा निकाल दि. २० ला जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. चव्हाण गुरुवारी नांदेडात होते. त्यानंतर ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले.