शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन व कलाजगत संस्थेने दिवंगत चित्रकार गोपाळ देऊस्कर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या अखिल भारतीय व्यक्तिचित्र स्पर्धेला महाराष्ट्रातील नामवंत व ज्येष्ठ कलाकारांसह परराज्यातील चित्रकारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली कला सादर केली. राज्यात प्रथमच अशा स्वरुपाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खडू, जलरंग, तैलरंग, अॅक्रिलिक अशा विविध माध्यमातून  व्यक्तिचित्रे समोर मॉडेल बसवून  सादर करण्यात आली.

शहरातील टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात काल, शनिवारपासुन सुरु झालेल्या या स्पर्धेत आज, रविवारी खुल्या व्यावसायिक गटातील चित्रकारांनी रंग भरला. दत्तात्रेय पाडेकर, विजय आचरेकर, श्रीकांत जाधव (सर्व मुंबई), सुरेश आवारी, रामकृष्ण कांबळे, अक्षयकुमार झा (बिहार) यांच्यासह पंचवीसहून अधिक चित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी नवोदितांसाठी प्रात्यक्षिकही सादर केले. काल विद्यार्थी गटासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात राज्यभरातील कला महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. समोर मॉडेल बसवुन, प्रेक्षकांचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने सुरक्षा अडथळे उभारुन शिस्तीच्या वातावरणात स्पर्धा झाली. नगरकरांनीही या कलाआविष्काराच्या ठिकाणी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन चित्रकारांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते फौंडेशनच्या वतीने यंदापासुन दिला जाणारा ‘कलामहर्षी र. बा. केळकर पुरस्कार’ ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, जुन्या पिढीतील कलाशिक्षक व बाँबे आर्ट सोसायटीचे उपाध्यक्ष रामदास फुटाणे यांनीही येथे भेट दिली. त्यांनी अशा प्रकारचा कलाविष्कार राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच सादर झाल्याचे सांगत आयोजक नरेंद्र फिरोदिया व प्रमोद कांबळे यांचे कौतुक केले. नगर जिल्हा राजकिय नेते, सहकार यामुळे ओळखला जातो, येथील लोक मतदार याद्याच उशाला घेऊन झोपतात, असाही उल्लेख होतो, मात्र माणसाला माणुस म्हणून ओळखून त्याच्यातील कलाविष्कार पाहणे हे काम अभिवादन करण्यासारखेच आहे, नगरसाठी ही स्पर्धा भूषणावह ठरेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. श्री. फिरोदिया व श्री. कांबळे यांनी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.