सिंधुदुर्गातील नैसर्गिक जैवविविधता अभ्यासकांनी सुरू केलेले प्रयत्न जिल्ह्य़ाच्या पर्यटन वाढीसाठी निश्चितच भूषणावह आहे. त्यातच वामन पंडित यांनी या निसर्गातील टिपलेली छायाचित्रांचे प्रदर्शनही अचंबित करून टाकणारे ठरेल असा विश्वास नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी व्यक्त केला.

वामन पंडित यांचे रानफुलं आणि पतंग सातवे छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष साळगांवकर बोलत होते. या वेळी सामाजिक वनीकरण उपसंचालक स्नेहल पाटील, वनस्पतितज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, वामन पंडित उपस्थित होते. वामन पंडित यांनी जिल्ह्य़ातील रानफुलांचे एकत्रित एकाच ठिकाणी दर्शन घडविले. हे प्रदर्शन जिल्ह्य़ाच्या पर्यटन वृद्धीसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. पक्षीमित्र, रानफुले अशा निसर्गाशी संबंधित चळवळी सावंतवाडीत होत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे असे बबन साळगांवकर म्हणाले. या वेळी सामाजिक वनीकरण उपसंचालक स्नेहल पाटील म्हणाल्या, सामाजिक वनीकरण हा विभाग निसर्गाच्या निगडितच आहे. रानफुले हा भाग निसर्गाच्या संवर्धाच्या चळवळीतील भाग असल्याने या कार्यक्रमात सहभागी झालो. सामाजिक वनीकरण फक्त लागवडच करत नाही तर पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठीही प्रयत्न करतो. वामन पंडित यांनी टिपलेली छायाचित्रे पाहता त्यांना घ्यावे लागलेले कष्ट व श्रमाचे मोजमाप करता येणार नाही. निसर्गाचा अभ्यास सर्वत्रच शांतपणे सुरू असतो, असे पाटील म्हणाल्या. या वेळी वामन पंडित म्हणाले, जिल्ह्य़ात दोन हजारांपेक्षा जास्त रानफुले आढळतात. मी २५० रानफुले छायाचित्रे टिपली आहेत. या टिपलेल्या रानफुलांची नावे, त्यांचे उपयोग व औषधी गुणधर्मही त्याखाली नोंदवून सचित्र दर्शनासाठी प्रदर्शित केले आहे. सिंधुदुर्गचा रानफुलांचा निसर्ग कासपठाराच्या तोडीचा आहे. वनश्रीने नटलेले भंडार गोळा करून जगासमोर ठेवले जाते. त्यासाठी सर्वाची मोलाची साथ हवी असे ते म्हणाले.
या वेळी डॉ. जी. ए. बुवा, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, प्रा. प्रवीण बांदेकर, महेंद्र पटेकर, डॉ. मधुकर घारपुरे, कवी कल्पना बांदेकर, प्रा. विजय फातर्फेकर, पद्मा फातर्फेकर, तसेच निसर्गप्रेमी उपस्थित होते.