मुंबईच्या पर्यटकाला आश्चर्याचा सुखद धक्का

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील काळा बिबट हा सर्वत्र कुतूहलाचा विषय झालेला असतानाच आता ताडोबात मुंबईच्या पर्यटकांना काळय़ा बिबटय़ाच्या जोडीने दर्शन देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र दर्शनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी या प्रकल्पात बघायला मिळते. वाघ व बिबटय़ा सोबत आता ताडोबात काळा बिबट हा कुतूहलाचा व संशोधनाचा विषय झालेला आहे. मुंबई येथील पर्यटक विवेक खोत यांनी ताडोबात नुकतीच व्याघ्र सफारी केली. या व्याघ्र सफारीत खोत व त्यांच्या सहकाऱ्यांना चक्क काळय़ा बिबटय़ाच्या जोडीने दर्शन देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. काळा बिबट यापूर्वी अनेकांना दिसला आहे. मात्र काळय़ा बिबटय़ाची जोडी अद्याप कुणाला दिसली नव्हती. ही जोडी बघण्याची पहिली संधी खोत यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे यातील एक बिबट हा पूर्णत: काळा आहे. दुसरा बिबट हा पूर्णत: काळपट रंगाचा होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. सध्या तो ७० ते ७५ टक्के काळा आहे. त्वचेच्या आजारातून बिबटय़ाचा रंग बदलत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता, ताडोबात आपण कधी काळय़ा बिबटय़ाची जोडी बघितली नाही. मात्र मुंबईच्या पर्यटकांना या जोडीचे दर्शन झाले. त्यांनी आपल्याला त्या बिबटय़ाचे छायाचित्र सुद्धा पाठवल्याची माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दरम्यान, या काळय़ा बिबटय़ात नर-मादी कोण हे कळले नाही, असेही त्यांनी सांगितले.