मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता. गुरुवारी झालेल्या (९ सप्टेंबर) या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन हे ५ वर्षांसाठी  किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.

प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य स्थान

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रम ठरवण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार आहे. तर, हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत नियुक्ती करता येऊ शकेल.

खर्च स्व निधीतून

विद्यापीठाला यासाठी लागणार खर्च स्व निधीतून करावा लागणार आहे. तर संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहणार आहे. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

संतपीठाची स्थापना

मराठवाडा विकासाच्या ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली आहे. यासाठी ज्ञानेश्वर उद्यानानजीकची १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार संतपीठाची प्रशासकीय इमारत, दोन वसतीगृहाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. सुरुवातीला सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेला हा विषय नंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paithan santpeetha course to start announces thackeray government gst
First published on: 15-09-2021 at 15:46 IST