अनोख्या पध्दतीने सरकारचा निषेध नोंदविला

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बेरोजगारांची अक्षरश: थट्टा चालविल्याने भाजपचा राज्यातील सत्तेत सहभागी मित्र शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकू पकोडा सेंटर सुरू करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बेरोजगारांच्या मोर्चा सहभागी झालेल्या बेरोजगारांनी पकोडय़ांची विक्री केली.

चंद्रपुरात आज बेरोजगारांचा मोर्चा निघाला. मोर्चा शिस्तबध्द पध्दतीने शहर सफाई करीत निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकताच सुशिक्षित बेरोजगारांनी शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या फेकू पकोडा सेंटर येथून पकोडय़ांची विक्री केली. शिवसेना नगरसेवक सुरेश पचारे, विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या कल्पनेतून या फेकू पकोडा सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी बेरोजगार तरुणांनी तिथे पकोडे तळले आणि तिथेच पकोडय़ांची विक्री केली. अशा अनोख्या पध्दतीने शिवसेना व बेरोजगारांनी राज्य तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. देशाचे पंतप्रधान, भाजपाचे अध्यक्ष आम्हाला पकोडे विकायला सांगतात, आम्ही पकोडे विकत आहोत, असेही बेरोजगार म्हणाले.