पी. साईनाथ यांची खंत
शासन व्यवस्थेवर वर्चस्व असलेले लोक नागरी असल्याने त्यांना ग्रामीण प्रश्नांची जाणीव नसल्याने गोहत्या बंदीसारखे निर्णय घेतले गेले. त्याचे दुष्परिणाम आज कातडी व्यवसायाबरोबर दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकरी वर्गावर होत आहेत. सरकारदरबारातील लोकांकडून प्रतिगामी शक्तीचे होणारे खोटे समर्थन खोडून काढण्याची जबाबदारी असलेली माध्यमे व्यावसायिक झाल्याने निधर्मीवादी अधिक अडचणीत आला असल्याची खंत रविवारी पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केली.

सांगलीच्या डेक्कन जिमखाना हॉलमध्ये झालेल्या दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पी. साईनाथ यांचे भाषण झाले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.एन.डी. पाटील तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे उपस्थित होते.
साईनाथ यावेळी म्हणाले की, सध्या माध्यमांवर कंपनी राज आहे. या कंपन्यांचे मालक अंबानी, बिर्लासारखे उद्योगपती बनले असल्याने व्यावसायिकपणा यामध्ये आला असून देशवाद, राष्ट्रहित महत्त्वाचे वाटत नाही. यापेक्षा यांना आयपीएलला महाराष्ट्राबाहेर घालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर भाष्य करतात. मात्र कुंभमेळ्यासाठी गंगापूर धरणातून १.०३ टीएमसी पाणी सोडले जाते. आणि चर्चा मात्र लातूरच्या वॉटर ट्रेनची केली जाते.
साखर उद्योग, आयपीएल, लवासा हे प्रकल्प शरद पवार यांच्याशी संबंधित आहेत. दुष्काळाचा विचार करताना याचा विचार केला जात नाही. बिअरसाठी ४ पसे प्रतिलिटर पाणी दिले जाते, मात्र पिण्याच्या पाण्यासाठी ४५ पसे प्रतिलिटर खर्च केले जातात हे कशाचे द्योतक आहे? इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पुष्पक विमानाची चर्चा होते, मात्र याचे खंडन प्रसिध्दिमाध्यमातून होत नाही. कारण प्रसिध्दिमाध्यमाचे मालक हे व्यावसायिकपणा जोपासत आहेत.
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून होतात. याचा तपास करण्यामध्ये शासन व्यवस्थेला गांभीर्य वाटत नसले तरी माध्यमांनी यात तपास हाती घेण्याची गरज असताना माध्यमे ग्लॅमरस व्यक्तींच्या प्रकरणात नको इतके दक्ष होतात. जे विकते ते देण्याचा प्रयत्न बाजारपेठ आधारित माध्यमे स्वीकारत असताना विवेकवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी आली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन हे केवळ कार्य नाही तर ती चळवळ म्हणून कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन साईनाथ यांनी केले.
यावेळी संमेलनात तीन ठराव पारीत करण्यात आले. यामध्ये दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुन्यांना शोधण्यास असमर्थ ठरलेल्या शासन यंत्रणेचा निषेध, जात पंचायतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा देशातील पहिला कायदा आहे याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असे तीन ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सुनील कुमार लवटे, प्र.रा. आर्डे, अविनाश पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी कुटुंबीयासमवेत शहरात मॉìनग वॉक करण्यात आला. आमराईजवळील अण्णासाहेब लठ्ठे यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या हा मोर्चा जिल्हाधिकारी निवासस्थान, राजवाडा चौक, पटेल चौक, हायस्कूल रोडमाग्रे पुन्हा आमराईजवळ समाप्त करण्यात आला.