नीरज राऊत

आजवर  डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यांतील अनेक गावांना मध्यम स्वरूपाचे ८२ धक्के बसले आहेत. ११ नोव्हेंबर २०१८ पासून पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अलीकडे १ सप्टेंबर २०२० पासून डहाणू तालुक्यात भूकंपाचे सात धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शासनाने उपाययोजना आखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले असले तरी आजवरच्या अभ्यासातील एकही उपाय या भागात योजण्यात आला नसल्याचे चित्र आहे.

अशा भूकंपाच्या धक्क्यांना प्रथम ‘स्वम्र्स’ असे संबोधण्यात येत होते. याविषयी हैदराबाद येथील भूभौतिक संशोधन संस्थेमार्फत तज्ज्ञांच्या एका गटाला अभ्यासासाठी पाचारण करण्यात आले होते. भूगर्भातील ‘इंडियन प्लेट’ची उत्तरेच्या आणि ईशान्य दिशेने हालचाल होत असल्याने धक्के जाणवत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. डहाणूतील धुंदलवाडी भागात ११ किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर रुंद अशी भूगर्भातील ‘फॉल्ट’ रेष असल्याचे निदान करण्यात आले. भूगर्भात शिरणारे पावसाचे पाणी या भागात होणाऱ्या भूकंपाच्या प्रकाराला कारणीभूत नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

परिसरात असलेल्या इमारतींचे आराखडय़ात (डिझाइन) मध्ये सुधारणा करून येथील इमारती आणि घरे भूकंपप्रवण क्षेत्राप्रमाणे मजबूत करण्यात यावीत, यासाठी ‘आयआयटी मुंबई’ येथील तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केला.  या भागातील ३४ शासकीय इमारतींचे ‘रेट्रो फिटिंग’ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. तसेच येथील घरांवरील सज्ज्यांचे विशिष्ट पद्धतीने मजबुतीकरण करण्याचा प्रस्ताव आराखडा या समितीने दिला होता. समितीने ‘रेट्रो फिटिंग’चा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असला तरी गेल्या वर्षभरात त्या दृष्टीने कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आश्रयासाठी प्लास्टिकचे तंबू उभारून दिले होते. याशिवाय या ठिकाणी ताडपत्रीचे वितरणदेखील करण्यात आले होते. मात्र वितरित करण्यात आलेले साहित्य सुमारे ७० हजार बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या तुलनेत तुटपुंजे ठरत असल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

घराबाहेर पळावे लागतेय..

१ सप्टेंबर २०२० पासून आजपर्यंत सात भूकंपाचे धक्के परिसराला बसले असून त्यापैकी तीन टक्के हे ३.५ तीव्रतेपेक्षा अधिक आहेत. या धक्क्यामुळे काही घरांचे नुकसान झाले असले तरी नागरिकांमध्ये भीती पुन्हा उफाळून आली आहे. हे धक्के रात्रीच्या वेळी बसत असल्याने झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे होऊन घराबाहेर राहण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा प्रशासनाने करोनाकाळात या भागात बंद केलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी या भागाचा दौरा करून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

या भागात इमारती, घरांचे व घरकुलाचे आराखडे तयार करताना भूकंपप्रवण क्षेत्राप्रमाणे करण्यात यावेत, भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.