02 March 2021

News Flash

पालघरमध्ये कुष्ठरोगाचे १४० नवीन रुग्ण

गेल्या पाच वर्षांपासून पालघर जिल्ह्यात रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने ५००पेक्षा अधिक राहिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| नीरज राऊत

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

पालघर : पालघर जिल्ह्यात असलेल्या ४००हून अधिक कुष्ठरोग रुग्णसंख्येत गेल्या वर्षभरात १४० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. कुष्ठरोग्याचे प्रमाण प्रति दहा हजार   नागरिकांमध्ये १.३४   इतके असून राज्यात पालघर जिल्हा अग्रक्रमावर असे सांगितले जात आहे. त्या अनुषंगाने येत्या डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील ६३८ गावांमधील सुमारे सोळा लाख लोकवस्तीवर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी योजना आखली जात आहे.

अधिक प्रमाणात पर्जन्यमान, दमट हवामान तसेच आजाराचा (इंक्युबॅशन) उद्वाहन कालावधी दोन ते दहा वर्षे असल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कुष्ठरोग झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.  रुग्णांकडून नियमितपणे औषधोपचार घेतली जात नसल्याने तसेच रुग्णांवर देखरेख व पाठपुरावा करण्यासाठी शासकीय यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षांपासून पालघर जिल्ह्यात रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने ५००पेक्षा अधिक राहिली आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर नऊ  ते १२ महिने नियमितपणे उपचार करून या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत देशभरात नोव्हेंबर ते मार्चदरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील ६३८ गावांमध्ये आशा सेविका व आरोग्य सेवक घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये त्वचेची तपासणी करून आजाराबाबत निश्चितता करण्यात येणार आहे. सद्यस्थिती तालुक्यात एक कर्मचारी कुष्ठरोग विभागातर्फे कार्यरत आहे. त्याखेरीज आशा सेविका तसेच वैद्यकीय अधिकारी यांना कुष्ठरोगा संदर्भात नियमितपणे प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या कार्यक्रमासाठी समर्पित कर्मचाऱ्यांची मर्यादा असल्याचे त्यांनी मान्य केले   आहे.

डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीत रुग्ण

डहाणू तालुक्यातील वाणगाव, कासा, सायवन व ऐना, जव्हार – जामसर, नांदगाव व साकुर, मोखाडा – आसे, तसेच तलासरी तालुक्यात उधवा व सुत्राकार भागात रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नवीन रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने ठेवला आहे. त्याचप्रमाणे या आजारावर सुरू असलेल्या औषधी उपचार कितपत प्रभावी आहे याचा अभ्यास व संशोधन करण्याची गरज असल्याचे आरोग्य क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:01 am

Web Title: palghar 140 new leprosy patients akp 94
Next Stories
1 वाढवण सागरी अभयारण्य घोषित करण्यासाठी मोहीम
2 समस्यांच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड
3 ‘रमाई आवास’ला घरघर
Just Now!
X