निखिल मेस्त्री

पालघर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पालघर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. या आरोपीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी पालघर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील उमरोळी येथील आरोपीस पालघर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर हा आरोपी पोलीस कोठडीत होता. त्याची करोना तपासणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

दरम्यान, या प्रकारानंतर या आरोपीच्या संपर्कात असलेल्या एका पोलीस अधिकार्‍यासह पोलीस कर्मचार्‍यांची तपासणी करून त्यांच्या विलगिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या आरोपीला करोनाची लागण कुठून झाली याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहेत. या आधीच पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या व आरोपीच्या संपर्कातून करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता पालघर पोलीस ठाण्यात अटक असलेल्या आरोपीला करोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांनाही करोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे पोलिसांमध्ये व त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.