ठाण्याजनजीकच्या पालघर मतदारसंघातील भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चिंतामण वनगा नवी दिल्लीत आले होते. कालपासून त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे ते आज घरीच विश्रांती घेत होते. मात्र, दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्या छातीत जास्तच दुखू लागल्याने त्यांना  राममनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाजपा पक्षातील आदिवासी चेहरा असलेले वनगा हे उच्च विद्याविभूषित होते. वकील असलेल्या वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. १९९० ते १९९६ पर्यंत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. २००९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.