जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घटक पक्षांच्या बैठका

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी भाजपला लक्ष्य केले असून त्यादृष्टीने महाविकास आघाडी करण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात घटक पक्षांच्या बैठका सुरू असून रविवापर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अचानकपणे पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्याने सर्वच राजकीय पक्ष बेसावध होते. आरक्षित जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याने या जागांकरिता उमेदवारांची जातवैधता प्रमाणपत्र व इतर कागदपत्र गोळा करण्यास सर्वच राजकीय पक्षांची कसरत करावी लागली. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार ते पाच दिवस वेळ असल्याने सर्वच पक्षांनी आपआपले इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

गेल्या काही निवडणुकांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व जनता दल यांनी ‘महाआघाडी’तर्फे निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. या निवडणुकीतही महाआघाडीची उभारणी होणे जवळपास निश्चित झाले असून त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर बोलणी सुरू आहेत. वेगवेगळ्या पक्षांकरिता जागावाटपाचा समीकरणावर अंतिम निर्णय झाल्यानंतर इतर उमेदवारांची माघार घेण्याबाबतची प्रक्रिया सोमवारी ३० डिसेंबर रोजी होणे अपेक्षित आहे.

राज्यपातळीवर ज्याप्रमाणे महाविकास आघाडी कार्यरत आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्य़ात अशी आघाडी निर्माण करावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडी शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर हातमिळवणी करण्यास विशेष इच्छुक नाहीत. तरीही याबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये या पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी शिवसेनेत शंभरहून अधिक इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे महाविकास आघाडी स्थापन झाल्यास शिवसेनेला मिळणाऱ्या २० ते २५ जागांमध्ये सर्व इच्छुकांना कशाप्रकारे सामावून घ्यायचे हा पक्षातील नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेचे संपर्कमंत्री रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावीत, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण यांनी जिल्ह्य़ातील विविध भागांचा दौरा करून कोणत्या जागांबाबत तडजोड होऊ  शकेल याचा अभ्यास केला आहे. याबाबत संबंधित भागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून रविवापर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

भाजपला लक्ष्य

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर तडजोडी करण्याच्या सूचना शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी तडजोड शक्य नाही किंवा इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी महाआघाडी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्य़ात महाविकास आघाडी स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी विकास आघाडी स्थापन करण्यासाठी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बोलणी सुरू असून याबाबत २९ डिसेंबपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत संभ्रम

जिल्हा परिषद कायद्यानुसार नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी ३० डिसेंबर हा एकच दिवस निश्चित करण्यात आला असून त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख निवडणूक कार्यक्रमात करण्यात आला आहे. असे असताना यापूर्वीच्या विविध निवडणुकींच्या अनुभव पाहता जिल्ह्य़ातील काही ठिकाणी ३० डिसेंबरपूर्वीही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारल्याचे दिसून आले आहे. यामुळे राजकीय पक्षांमध्ये निवडणूक कार्यक्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. उमेदवारी मागे घेऊ इच्छिणाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.