सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा; औषधफवारणी, जंतुनाशकांवरील खर्चही वाया

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये गेल्या महिन्याभरापासून डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नगर परिषदेने स्वच्छता सफाई, गटार सफाई, औषध फवारणी व जंतुनाशके खरेदीसाठी मोठा निधी खर्च केला असला तरी डासांचा प्रादुर्भाव वाढतच आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात पालघर नगर परिषद सपशेल फोल ठरल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

पालघर नगर परिषद हद्दीतील उघडी गटारे, ठिकठिकाणी पडलेला कचरा, मासळी बाजारातील मासळी जैवयुक्त कुजके सांडपाणी, उघडे पाणवठे, वाढलेली झाडेझुडपे आदींमुळे या डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तसेच यावर नगर परिषदेमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी आणि गटार सफाई करण्यात आली. त्याचा प्रभाव नसल्याचे या डासांचा प्रादुर्भावावरून दिसून येत आहे. या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे पालघर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नगर परिषदेचे अलीकडेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक पालघरवासीयांसाठी काहीतरी चांगले करतील, या आशेने नागरिक त्यांच्याकडे पाहत असले तरी नगर परिषदेच्या कोणत्याही प्रभागांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधात प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येत आहे. याउलट नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात डास असल्याचे नागरिक सांगत आहेत.

नगर परिषद क्षेत्रात विकास कामांतर्गत रस्ते आधी सुधारण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले असले तरी उघडी गटारांत साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. यासाठीही उघडी गटारे बंद करावी, अशी मागणीही नागरिकांकडून यानिमित्त होत आहे. नगर परिषद लाखो रुपये खर्चून जंतुनाशके खरेदी करते आणि ही जंतुनाशके डास फवारणीसाठी वापरली जात असली तरी या फवारणीचा प्रभाव अगदी काही काळ राहतो. नंतर पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे या डासांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

नगर परिषदेने ऑक्टोबर १९ ते जानेवारी २०२० या चार महिन्यांमध्ये स्वच्छता सफाईसाठी ६६ लाख ९५ हजार, गटार सफाईसाठी २५ लाख ६८ हजार, औषध फवारणीसाठी २० लाख ९८ हजार, तर जंतुनाशके खरेदी करण्यासाठी ५ लाख १७ हजार इतका निधी खर्च केला असला तरी हा निधी वापरल्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव कायम आहे. याचाच अर्थ लाखो रुपये खर्च करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद सपशेल अपयशी ठरली आहे असेच दिसत आहे.

अलीकडे पालघर नगर परिषदेच्या झालेल्या अनेक सर्वसामान्य सभांमध्ये कोणीही सदस्यांनी डांस प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात प्रश्न मांडलेले दिसून येत नाहीत. याउलट नगर परिषदेच्या सभेत जनसामान्यांच्या समस्या सोडून अनधिकृत बांधकामे व भ्रष्टाचाराच्या मोठय़ा मोठय़ा चर्चा रंगात येत आहे. त्यामुळे नगर परिषदेला नागरिकांची तमा नाही, असे आरोपही यानिमित्ताने नागरिक नगर परिषदेवर करीत आहे.

नगर परिषदेच्या हयगयीमुळे गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे नगर परिषद प्रशासन स्वत: मान्य करीत असले तरी त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलल्याचे दिसत नाही. पालघर नगर परिषदेतील डासांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांकडून जोर धरत आहे

‘करोना’ आजार फैलू नये यासाठी मिळालेल्या मार्गदर्शक सूचना अनुषंगाने संपूर्ण जिल्हा प्रशासन त्याच्या अंमलबजावणीसाठी सज्ज असताना पालघर नगर परिषद क्षेत्रात मात्र डासांचा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा मोठा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच डासांच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदेने तातडीने त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. नगर परिषद डास प्रतिबंधक फवारणी जमिनीवर की, आकाशात करीत आहे का, असा प्रश्न पडत आहे, अशी टीका  नागरिक अशोक चुरी यांनी केली.

डास प्रतिबंधात्मक औषध घेण्यात कर्मचाऱ्यांकडून हयगय झाल्यामुळे अलीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर जंतुनाशके खरेदी करू.

-डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षा

डास प्रतिबंधात्मक फवारणीसाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करूनही डासांचा प्रादुर्भाव कायम आहे. याचाच अर्थ हा निधी वाया घालवला आहे. याचे उत्तर नगर परिषदेने  द्यायला हवे.

-कैलास म्हात्रे, गटनेता, शिवसेना</strong>

 

महिना स्वच्छता  गटार सफाई     औषध फवारणी      जंतुनाशक

ऑक्टोबर २०१९    १६,७६०७८         ६,४२,१६०

नोव्हेंबर २०१९     १६,७३८००          ६,२८,२००

डिसेंबर २०१९      १६,७६०७८           ६,४९,१५०                २०,९८,४००

जानेवारी २०२०    १६,६९१८२         ६,४९,१४०                  ५,१७०००

(खर्च रुपयांत)