पालघर: ‘तौत्के’चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने सोमवारपासून किनारपट्टीच्या तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी सकाळी ८ वाजे पर्यंत पालघर तालुक्यात २९८ मिलिमीटर व डहाणू तालुक्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या वादळात वसई तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक नागरिक जखमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सोमवारी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात वसई तालुक्यात १९२, तलासरी तालुक्यात १६७, वाडा तालुक्यात ८७, विक्रमगडमध्ये ६९, जव्हार मध्ये १७ तर मोखाडा तालुक्यात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यामुळे पालघर तालुक्यातील दोन मासेमारी बोटी बुडाल्या असून ३३७ पेक्षा अधिक घरांचे छप्पर उडाले. या खेरीज ५० हून अधिक झाडे उमळून पडली असून पाच इमारती, दुकानांची अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. प्रत्यक्षात जिल्ह्यत झालेले नुकसान नमूद केलेल्यापेक्षा अधिक असून वादळी वातावरण निवळले की सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वादळी वाऱ्यामुळे फळझाडांना फटका

पालघर जिल्ह्य़ातील डहाणू, पालघर, तलासरी व वसई या चार तालुक्यांतील सुमारे अठराशे ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या आंबा उत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.  रविवारी सायंकाळपासून किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडावर असलेला आंबा वादळी वाऱ्यामुळे खाली गळून गेल्याचे मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. सध्या ७० ते ८० टक्के फळ झाडावर होते व वादळी वातावरणात आंबा खाली गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाडा, विक्रमगड या दोन तालुक्यांत जवळपास ११५० हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा आहेत. तर काही ठिकाणी केळीच्या बागा आहेत.  येथील शेतकरी विशेषत: केशर व हापूस या दोन वाणातील आंब्यांचे उत्पन्न घेत असतात. या वर्षी आंब्याचे उत्पादन चांगले आलेले असतांनाच अचानक आलेल्या या तोक्ते चक्री वादळाचा फटका आंबा पिकाला बसल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

फळबागांची हानी

  • पालघर जिल्ह्य़ातील डहाणू, पालघर, तलासरी व वसई या चार तालुक्यांतील सुमारे अठराशे ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या आंबा उत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.
  • रविवारी सायंकाळपासून किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडावर असलेला आंबा वादळी वाऱ्यामुळे खाली गळून गेल्याचे मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
  • सध्या ७० ते ८० टक्के फळ झाडावर होते व वादळी वातावरणात आंबा खाली गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
  • वाडा, विक्रमगड तालुक्यांत या वर्षी आंब्याचे उत्पादन चांगले आलेले असतांनाच अचानक आलेल्या या वादळाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.

तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळल्याने गेल्या दोन दिवसांपासून समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात सोसाटय़ाचा वारा वाहू लागला आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान प्रवास करत असलेल्या भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला तात्काळ उत्तन समुद्रकिनाऱ्यावर उतरवण्यात आले. समुद्रकिनारी अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने स्थानिक नागरिकांची धावपळ सुरू झाली. मात्र पंधरा ते वीस मिनिटानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मार्गस्थ झाले.

नागले येथे भुयारी मार्गात पाणी

वसई पूर्वेतील कामण परिसरात असलेल्या नागले गावात जाण्यासाठीच्या भुयारी मार्गात मुसळधार झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे येथील येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कामणजवळील नागले या गावात हजारोंच्या संख्येने लोकवस्ती आहे. या भागात ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गातच पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गावाच्या बाहेर जात येत नाही. मागील वर्षीपासूनच हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग तयार करताना पाणी जाण्यासाठीचे कोणतेच मार्ग तयार न केल्याने पहिल्या पावसातच येथील नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे.