नीरज राऊत

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राच्या संख्येत घट होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. महामार्गावरील अपघातांची ठिकाणे  ६६ वरून २२ वर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, असे असले तरी अपघातांची मालिका ही सुरूच आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक क्षेत्रांमध्ये अपघात वारंवार होताना दिसून येत आहेत.  आठवडय़ातून एक ना दोन अपघात असतात. सन २०१५ ते २०१८ दरम्यान या महामार्गावर २२ मोठे अपघात घडले असून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाली होती. २०१८ नंतरदेखील अपघातांची मालिका सुरूच आहे.

विरारजवळील सकवार, भिलवली, कोपर, भारोळ, खानिवडे, वालिव, सातवली, सासू नवघर, मालजीपाडा, मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हालोली, चिल्हार, जव्हार फाटा, कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली, मेंढवण, चारोटी, आच्छाड या परिसरांत तर तलासरी तालुक्यात वाढवली,  डोंगरीपाडा या पट्टय़ांमध्ये अपघात होताना दिसतात.

राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून तसेच परिवहन विभागाकडून दिलेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता व इमारत विभाग, परिवहन विभाग व पोलीस यांच्या प्रतिनिधींनी अपघातस्थळी संयुक्त पाहणी करून अपघातामागील कारणांची मीमांसा व अभ्यास केला जातो. त्यावरून तातडीने तसेच दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी केली गेल्याने महामार्गावरील अपघातांची ठिकाणे  ६६ वरून २२ वर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मोठय़ा अपघातानंतर होणाऱ्या पाहणीनंतर रस्त्यावर रुम्बलर मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक उभारणे, गती नियंत्रण ठेवण्याचे व अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे सूचना फलक लावण्याचे काम हाती घेण्यात येते. तर दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये उड्डाणपूल पदाचारी पूल, उड्डाणपूल किंवा  भुयारी मार्ग (अंडरपास) निर्माण करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येते.

भारोळ येथे पादचारी पूल बांधण्यात आला असून मालजीपाडा व भालीवल येथे भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सातिवली येथे भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच घोडबंदर परिसरात फाउंटन जंक्शन येथे अपघातप्रवण क्षेत्रावरदेखील काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अपघात घडल्यानंतर मदतकार्यासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिका व क्रेन यांच्या निरीक्षकांकडून अहवाल मागवला जात असून अपघातांमागील कारणांचा अभ्यास सातत्यपूर्ण केला जात आहे. त्यावर उपाययोजना आखून अपघातांची संख्या कमी करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चारोटी उड्डाणपूल धोकादायक

चारोटी येथे अनेक वर्षे रेंगाळलेला उड्डाणपूल सुरू करताना पुलाचा व जोडरस्त्याचा मार्ग ठरविताना स्थानिक व राजकीय मंडळींचा मोठय़ा प्रमाणात अडथळा आला होता. कोणत्याही वळण क्षेत्रावर पुलाची उभारणी करू नये किंवा पुलावर वळण देऊ नये असे संकेत असताना स्थानिकांच्या दबावामुळे हा पूल उभारताना योग्य खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्राकडून सांगण्यात येते.  तरीदेखील या उड्डाणपुलावर क्रॅश बॅरियर लावण्यात आले असून वाहने कमी वेगाने चालवण्याचा सूचना फलकाद्वारे देण्यात आल्या आहेत. वळण क्षेत्रात वेगाने धावणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात  होत असल्याचे सांगण्यात येते.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?

रस्ते अपघातांच्या परिभाषेत राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर लांबीच्या अंतरावर तीन वर्षांत पाच अपघात होऊन त्यामध्ये दहापेक्षा अधिक नागरिक मृत्यू पावले तर त्याला ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून संबोधले जाते. ज्या ठिकाणी असे अपघात होतात त्या ठिकाणांना पोलीस किंवा परिवहन विभागाकडून  ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर केले जाते. एकंदरीत तीन वर्षांंमध्ये झालेल्या अपघातांची संख्या व मृतांचा आकडा यावरच ब्लॅक स्पॉट ठरतो, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जाते.