लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पालघर : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. पालघर लोकसभा मतदारसंघात १८ लाख १३ हजार मतदार २१२० मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणुकीच्या आयोजनासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे नारनवरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पालघरमध्ये डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम आणि जिल्हा प्रशासनाची तयारी याबाबत माहिती दिली. पालघर येथे २ एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येणार असून ९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. १० एप्रिल रोजी अर्जाची छाननी होऊन १२ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असेल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे उपस्थित होते.