|| विजय राऊत
कासा : पालघर जिल्ह्यामधील पाड्या पाड्यावर जाऊन अध्यापन करणाऱ्या १४ हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन तारीख उलटून २२ दिवस झाले तरी अद्याप त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
महिन्याच्या १ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. परंतु या निर्णयानुसार पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना क्वचितच १ तारखेला वेतन दिले जाते. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या वेतनाची तारीख ही निश्चित नसते. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षकांना या अगोदरच डिसेंबरचे वेतन मिळाले होते. करोनाकाळात जवळपास सर्वच शिक्षकांनी आगाऊ रक्कम घेतल्याने ती डिसेंबरच्या वेतनातून कपात केली होती. आर्थिक वर्ष संपत आल्याने आपल्याकडील शिलकेतून बाकी असलेल्या एलआयसी तसेच इतर इन्शुरन्स वगैरे रकमा भरून टाकल्या. मागच्या महिन्यांत १ तारखेला वेतन झाले होते. म्हणून या महिन्यातसुद्धा एक तारखेला पगार होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. परंतु गेल्या २३ दिवसांपासून त्यांना वेतन अद्याप मिळालेले नाही.
शिक्षकांचे एक तारखेला वेतन देण्याचा नियम आहे. केवळ कार्यालयाच्या चुकीच्या नियोजनामुळे शिक्षकांना उशिरा वेतन मिळते. दरवेळेस वेळेवर वेतन देऊ असे सांगितले जाते. पण वेळेवर कधीच वेतन मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना विनाकारण आर्थिक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो, असे आदिवासी शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार लिलका यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:27 am