25 February 2020

News Flash

पालघरमध्ये भगवा

एकतर्फी लढतीत राजेंद्र गावित ८८ हजारांहून अधिक मतांनी विजयी

गावित यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

एकतर्फी लढतीत राजेंद्र गावित ८८ हजारांहून अधिक मतांनी विजयी

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा ८८ हजारांहून अधिक मतांनी पराभव करून पालघर लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकवला आहे. बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या नालासोपारा, बोईसर आणि वसई या मतदारसंघांमध्ये त्यांच्या पक्षाची झालेली पीछेहाट ही आगामी काळासाठी पक्षनेतृत्वासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.

शिवसेनेने पालघरसह बोईसर, नालासोपारा या विधानसभा मतदार क्षेत्रांमध्ये मुसंडी मारून वसई, डहाणू व विक्रमगड या मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मर्यादित मताधिक्य मिळाले. विरार- वसई महानगरपालिका क्षेत्रात त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीची आमदारकी असलेल्या बोईसर मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे पंख सेना उमेदवारांनी कापल्याने अटीतटीची वाटणारी लढत एकतर्फी झाली.

राजेंद्र गावित यांनी प्रारंभापासून मतमोजणीत आघाडी घेतली व मताधिक्य सातत्याने वाढत राहिले या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला अनेक ठिकाणी मतदारांनी नाकारले दिसून आले त्याचप्रमाणे या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात झालेले मतदान तसेच गेल्या वर्षभरात सुमारे दीड लाख नव्याने नोंदले गेले मतदार हे या निवडणुकीत महत्त्वपूर्ण घटक ठरले आहेत.

या निवडणुकीत राजेंद्र गावित याना ५८०४७९ तर बळीराम जाधव याना ४९१५९६ मते मिळाली. या निवडणुकीत २९४७९ मतं नोटा ला मिळून नोटा तिसरम्य़ा क्रमांकावर राहिला. पालघर विधानसभा क्षेत्रांमध्ये शिवसेनेने ५९ हजार मतांची आघाडी घेतली असून बोईसर मध्ये २८ हजार, नालासोपारामध्ये २५ हजारांहून अधिक मताधिक्य घेतल्याने ही निवडणूक शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाजूने झुकली. असे असताना बहुजन विकास आघाडीला वसई मधून फक्त ११ हजार मताधिक्यावर समाधान मानावे लागले, तर बहुजन विकास आघाडीने डहाणूमध्ये आठ हजार विक्रमगडमधून साडेपाच हजार अधिक मताधिक्य घेतल्याने त्या भागामध्ये शिवसेनेवर अंकुश ठेवण्यात यश आले. मात्र या निवडणुकीत शिवसेना- भाजप,. रिपाई तसेच श्रमजीवी संघटनेच्या मदतीने शिवसेनेने विजय मिळवण्यात यश मिळवले.

विजयाचा जल्लोष

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी मिळविल्याने युतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला, तर बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रांत सर्वत्र शुकशुकाट होता. आरंभी काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या मतमोजणी काही तासांनी वेळ घेतला. सुरुवातीच्या काही मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यांच्यात अटीतटीची लढत सुरू होती. दुपारी १२ वाजेपर्यंत गावित यांनी २० हजार मतांची आघाडी मिळविली होती.

प्रमुख नेत्यांचे पालघरमध्ये ठाण

पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे आल्यापासून चर्चेमध्ये होता. त्यानंतर राजेंद्र गावित यांना भाजपामधून आयात केल्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. त्याचबरोबरीने बहुजन विकास आघाडीचा गेल्या वीस वर्षांपासून असलेले ‘शिट्टी’ हे चिन्ह नाकारून त्यांना ‘रिक्षा’ या चिन्हावर समाधान मानावे लागले. पालघर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभा घेऊन वसई तालुक्यात बविआचा बालेकिल्ला मोडून काढण्याचे काम केले.  राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये ठाण मांडलेले होते.

First Published on May 24, 2019 3:54 am

Web Title: palghar election results 2019 lok sabha election 2019 rajendra gavit win
Next Stories
1 पालघर जिल्ह्यात युतीचा जल्लोष!
2 आघाडीची नाराजी ‘बविआ’ला भोवली
3 ठाणे युतीचेच ! स्थानिक मुद्दे मोदींपुढे गौण
Just Now!
X