News Flash

पालघर : ग्रामीण भागातील पाचशेहून अधिक करोना रुग्णांसाठी सुविधा तयार

आवश्यकता भासल्यास ४० नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची प्रशासनाची तयारी

पालघर : ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्णांसाठी सज्ज असलेले कोविड रुग्णालय.

नीरज राऊत

पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या १९ कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र तसेच समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये पाचशेहून अधिक करोना बाधितांवर उपचार करण्याची सुविधा कार्यरत असून आवश्यकता भासल्यास ही व्यवस्था दुप्पट करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या विविध ठिकाणी २४ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून सात व्हेंटिलेटर्स वितरित होण्याची प्रतिक्षा आहे. या उपर जिल्ह्याने आवश्यकता भासल्यास ४० नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची आरोग्य संचालकांकडून परवानगी घेतली आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या १२५च्या पुढे गेली असून त्यापैकी ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या नागरिकांना सर्दी, खोकला व ताप व करोना सदृश्य लक्षणे दिसतात त्यांची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याठिकाणी रुग्णांचे तापमान तसेच पल्स मीटरद्वारे तपासणी केली जाते. अशा ताप उपचार केंद्रावर कार्यरत केलेल्या फिवर ट्रिटमेंट सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी सुविधा तयार करण्यात आली असून या उपचार केंद्राची समता अठराशेपर्यंत वाढवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

अशाच कोविड केअर सेंटरमध्ये स्वतंत्र विभाग करून लक्षणे दिसून न येणाऱ्या करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात आला आहे. याठिकाणी आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून या ठिकाणी गंभीर होणाऱ्यांना आवश्यकतेनुसार समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये रुपचारासाठी हलवण्याची व्यवस्था आहे.

करोना आजाराची लक्षणे दिसणार्‍या रुग्णांना दाखल करण्यासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालय (२०), डहाणू येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालय (२०), आयडीला रुग्णालय, वाडा (१००) तसेच दयानंद रुग्णालय तलासरी (५०) येथे सुविधा उपलब्ध आहेत. सध्या अशा समर्पित कोविड आरोग्य केंद्रमधील वैद्यकीय उपचाराची क्षमता १९० खाटांची असली तरीही त्यामध्ये आवश्यकता भासल्यास डहाणू येथील वेदांत रुग्णालयातून अडीचशे खाटांची भर टाकण्यासाठीची तयारी हाती घेण्यात आली आहे. अशा प्रत्येक समर्पित कोविड आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून अशा ठिकाणी प्रत्येक खाटेवर प्राणवायू पुरवण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

करोना सोबत वेगेवेगळे आजार किंवा गंभीर रुग्णांसाठी जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत बोईसर येथील टीमा रुग्णालयात अशा तीस रुग्णांना दाखल करण्याची सुविधा असून विक्रमगड रिवेरा रुग्णालयात येथे अशा प्रकारच्या दोनशे खाटांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय रिवेरा येथील केंद्रामध्ये ५० आयसीयू खाटांचा समावेश आहे.

याखेरीज आवश्यकता भासल्यास पालघर येथील डॉ. (ढवळे रुग्णालयात (५०) तसेच डहाणू येथील वेदांता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (२५०) अशा एकूण तीनशे अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. अशा केंद्रांमध्ये डायलिसिस, प्रसूती, ऑर्थोपेडिक विभाग व लहान ऑपरेशन करण्याची व्यवस्था असून या ठिकाणी निर्माण होणारे बायोमेडिकल घनकचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी व जेवण पुरवण्यासाठी ठेकेदाराची नेमणूकही करण्यात आली आहे.

ग्रामीण जिल्ह्याच्या भागात सध्या २४ ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा असून सात नव्याने विकत घेतलेले व्हेंटिलेटर्स लवकरच दाखल होण्याच्या स्थितीत आहेत. याखेरीज जिल्ह्यात आवश्यकता भासल्यास वैद्यकीय विभागाच्या संचालकांकडून ४० नवीन व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची तांत्रिक परवानगी पालघर जिल्ह्याने प्राप्त केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 6:06 pm

Web Title: palghar facilities for more than 500 corona patients in rural areas aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 परदेशातील ४ हजार भारतीय महाराष्ट्रात दाखल; १३०९ नागरिक मुंबईतील
2 सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड
3 “करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही”, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र
Just Now!
X