आम्ही कोणतेही काम केले की काही लोकांकडून विरोध केला जातो. त्यांनी पालघरच्या विकासाबाबत भाष्य केले नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना होती. पण दुर्दैवाने ती आता शिवविरोध सेना झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

वसईतील माणिकपूर येथे शनिवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यात त्यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली. पालघरमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला. वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल शिवसेना आणि वनगा यांचे चिरंजीव करत आहे. चिंतामण वनगा यांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, शिवसेनेचे नेते आता मते मागायला येत आहेत. पण वसईतील बसेसच्या २६ फेऱ्या कोणी बंद केल्या?. शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे गेले. त्यावेळी रावतेंनी बससेवा सुरु करण्यास नकार दिला होता. आता हीच लोकं पोपटासारखं बोलत आहेत, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्यांची स्वप्नं होती, आता तो पक्ष कुठे गेला?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेच्या भाषणांनी खालचे स्तर गाठले आहे. भाजपाचे रक्त तुम्ही पाहिलं नाही. तुमच्या जन्मापूर्वीपासून भाजपाने संघर्ष केला आहे. आमच रक्त भेसळयुक्त असल्याची टीका तुम्ही करताय. मग चिंतामण वनगा यांचे रक्तही भेसळयुक्त असल्याचे तुम्ही म्हणताय का? आणि हे बोलून त्यांच्याच मुलाला गावोगावी घेऊन फिरता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा

शिवसेनेने ‘सामना’मध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधून श्रीनिवास वनगा गायब आहेत. निवडणुकीपूर्वीच ही अवस्था असेल तर नंतरच्या परिस्थितीचा अंदाज येईल. श्रीनिवास तू कुठे फसलास रे बाबा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.