महाराष्ट्रासह देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आरोग्य सेवेवर प्रचंड ताण पडला असून, राज्य सरकारने करोना संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अनेक सेवा आणि कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे. तर लग्नासाठी दोन तासांचाच वेळ देण्यात आलेला आहे. त्यासाठीही स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलेलं आहे. असं असताना पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एका रिसॉर्टवर विनापरवानगीच विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने अचानक धाड टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला. मात्र, अधिकाऱ्यांना पाहुन मात्र वऱ्हाड्यांची पळापळ झाली. या प्रकरणी वर व वधूच्या पित्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात विना परवानगी होत असलेल्या विवाह समारंभावर वाड्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. २९ एप्रिलच्या रात्री १० वाजता वाड्याच्या उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वात महागडे दर असणाऱ्या ANCHAVOYO Resort खरिवली तर्फे कोहोज येथे अचानक धाड टाकली. यावेळी असता त्या ठिकाणी जवळपास १०० जण लग्न समारंभासाठी करण्यासाठी एकत्र आले होते. या रिसॉर्टच्या आवारामध्ये ५० पेक्षा अधिक वाहन असल्याचं सांगण्यात येतं. या धाडीनंतर आलेल्या वऱ्हाड्यांनी लग्नस्थळावरून काढता पाय घेतला.

या लग्नास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नसल्याने तसेच महाराष्ट्र शासनाने विवाह सोहळ्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधाचा भंग केल्या प्रकरणी वर पिता, वधू पिता आणि केटरर्स यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नियमांचा भंग केल्याप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हे रिसॉर्ट सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.