पालघरचा मासळी बाजार आता पूर्वेला; मनोर मार्गावरील विक्रेत्यांचेही स्थलांतर

पालघर : पालघर रेल्वे स्थानकाजवळ भरणारा मासळी बाजार पूर्वेकडे हलवण्यासाठी नगर परिषदेने तयारी पूर्ण केली आहे. मात्र सध्याच्या करोनास्थितीचा लाभ घेऊन काही मासे विक्रे त्यांनी पूर्वीच्या ठिकाणी तर इतर काहींनी पालघर बाह्य़वळण मार्गावर व्यवसाय थाटला आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये पालघरचा मासळी बाजार आणि मनोर मार्गावरील पदपथ, फेरीवाले व इतर विक्रे ते पूर्वेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जुना पालघर येथे असलेल्या  मासळी बाजारात जागा अपुरी पडत असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर मनोर मार्गावर मासे विक्रे ते बसू लागले. कालांतराने या भागाला मासळी बाजाराचे स्वरूप आले. या बाजाराची व्याप्ती वाढत गेल्याने काही विक्रे ते मुख्य रस्त्यावर बसू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. हा नवीन मासळी बाजार तसेच या भागात बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना पूर्वेकडील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या प्रस्तावित ठिकाणी पाण्याची तसेच शौचालयाची सुविधा नसल्याचे कारण पुढे करीत या बाजाराचे स्थलांतर रोखण्यात आले होते. त्याच पद्धतीने पालघरच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा पदाचारी पूल कार्यरत नसल्याने हे बाजाराचे स्थलांतर झाले नाही. पूर्वेकडील बाजारात पश्चिमेकडील नागरिक खरेदीकरिता येणार नाहीत, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत होती. नगर परिषदेने पाणी, वीज व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली असून रेल्वे पादचारी पूलदेखील कार्यरत झाला आहे.

दरम्यानच्या काळात माशांची आवक वाढली असल्याने तसेच नागरिक पावसाळ्याच्या दिवसात पूर्वेकडील बाजारात येण्यास अनुकूल नसल्याचे कारण पुढे करून काही मासळी विक्रेत्यांनी पूर्वीच्याच ठिकाणी तर इतर काही विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते होली स्पिरिट शाळेपर्यंतच्या जागेत विक्रीस आरंभ केला. या सर्व ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असला तरी आगामी काळात विविध ठिकाणी बाजार भरविण्यास संधी दिल्यास त्या ठिकाणांची स्वच्छता राखणे कठीण होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पूर्वेकडील भागात एकत्रित मासळी मार्केट उभारण्याचे नगर परिषदेच्या वतीने योजण्यात आल्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी सांगितले.

ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना

पालघरचे मासळी बाजार पूर्वेकडे स्थलांतरित करण्याच्या भूमिकेवर पालघरचे काही नगरसेवक बोटचेपी भूमिका घेत आहेत, तर परवानगी नसलेल्या ठिकाणी विक्रीसाठी बसणाऱ्या विRेत्यांविरुद्ध कारवाई करण्यास पुढाकार घेणाऱ्या काही नगरसेवकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी, स्वच्छता राखण्यासाठी सुनियोजित ठिकाणी मासळी बाजार स्थलांतरित करणे ही काळाची गरज असल्याचे पालघर नगर परिषदेतर्फे सांगण्यात येत असून ध्वनिक्षेपकाद्वारे सर्व विक्रेत्यांना सूचित करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला शहरात असलेल्या सर्व फळ-भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाडय़ा, मासळी बाजार पूर्वेकडे स्थलांतरित करू, असा विश्वास नगर परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आला.