नीरज राऊत

पालघर शहर आणि जिल्ह्य़ात टाळेबंदीच्या काळात पोलीस दल जितक्या तत्परतेने रस्त्यावर फिरणाऱ्यांवर लाठी उगारताना दिसले तितक्याच कठोरतेने गुटखा, दारू तस्कर, चोर-गुन्हेगारांवर कारवाईसाठी तत्पर राहतील का? जिल्ह्य़ात काही दिवसांमागे घडलेल्या काही घटनांमध्ये पोलीस तसे वागताना दिसले नाहीत म्हणून! चिंतेची बाब ही की चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचेच प्रकार पोलिसांकडून घडत आले आहेत.

करोना संसर्गाच्या शक्यतेने देशभरात टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीतील प्रत्येक नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अर्थातच पोलिसांवर येऊन पडली. त्याच काळात गुजरात राज्याच्या सीमेनजीक असलेल्या पालघर जिल्ह्य़ातील गडचिंचले गावात हृदयाचा थरकाप उडविणारे साधू हत्याकांड घडले. ही घटना पोलिसांसमोरच घडली. टाळेबंदीतील कठोर नियमांमुळे काहींचे प्राणही जाऊ शकतात, हे दर्शविणारी ही घटना. अर्थात पोलीस इथे हतबल ठरले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून कारवाई केली असती तर ही घटना टाळता येऊ शकली असती, असे मत व्यक्त करण्यात आले. हे झाले एक.

पोलिसांच्या कार्यतत्परतेची दुसरी बाजू पाहायची झाल्यास टाळेबंदी दाणागोटा बंद झालेल्या सामान्यांना पोलीस दलाने दंडुक्याचा मार दिला. जिथे नियमांच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता होती, तिथे पोलिसांनी अधिकच कठोरता दाखवली. करोना महासाथीचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने शारीरअंतर पाळणे आवश्यक होते. याचा अर्थ पोलिसांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबणे अपेक्षित नव्हते. करोना टाळेबंदीच्या पहिल्या सत्रात दुचाकीस्वारांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. हेच सूत्र गडचिंचले गावातही लागू पडू शकले असते. कारण काही अनोळखी व्यक्तींनी गावात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला आहे, हे समजल्यानंतर उपस्थित पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून लोकांना एकत्र जमण्यापासून रोखायला हवे होते. ज्या निष्ठुर पद्धतीने पोलिसांनी शहर-गावांतील नागरिकांवर लाठीमार केला, तीच कठोरता ते गडचिंचले गावात दाखवू शकले नाहीत, असा प्रश्न या घटनेनंतर लगेचच विचारला गेला आणि आजही तो विचारला जाऊ लागला आहे.

याला कारणही तसेच आहे. पोलिसांना जे रोखायला हवे ते करण्यात पोलिसांचा समन्वय कमी पडतो. याला अकार्यक्षमता म्हणायची का, या प्रश्नाला पोलिसांनी त्यांच्या कृतीनेच उत्तर द्यायचे आहे. कारण आजवर अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगी पोलिसांची अकार्यक्षमता जनतेसमोर दिसून आली आहे.

का ते येथे सांगता येईल. एक, गुजरात आणि राजस्थानातून येणारा गुटखा आणि दारू तस्करी. महाराष्ट्राची सीमा ओलांडून हे तस्कर पालघर जिल्ह्य़ात येतात. बरं ते सीमावर्ती भागातील पोलिसांची तपासणी चुकवून आत येतातच कसे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. तेथे पोलीस कमी कसे पडतात? हीच तऱ्हा जुगाराच्या अड्डय़ांवरील कारवाईबाबत म्हणता येईल. जिल्ह्य़ातील असे कैक अड्डे अजूनही सुरूच आहेत. उलट श्रेयवाद घेण्यासाठी काही पोलीस अधिकारी या घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस तपास आणि कारवाईत सातत्य नसल्याचा ठपका अनेकदा ठेवण्यात आला आहे.

टाळेबंदीतील काही नियम आजमितीला शिथिल करण्यात आले आहेत. त्यात मंदिरे आणि इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही धर्मपरंपरा म्हणून हिंदूच्या महत्त्वाच्या सणाला मंदिरात नियम पाळून पुजाऱ्याच्या उपस्थितीत काही विधी करण्यात येत आहेत. तशी मुभा गणेशोत्सवात काही सार्वजनिक मंडळांना देण्यात आलेली होती.

महत्त्वाचे म्हणजे घटस्थापनेला एका पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याने केळवा येथील मंदिरात बूट आणि गणवेशासोबत असलेला कमरेला चामडी पट्टा घालून गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंदिराच्या पुजाराने आणि काही विश्वस्तांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. पोलीस गणवेशातील अधिकाऱ्याने मंदिरात प्रवेश करताना धर्मपरंपरेचे काही नियम पाळले नाहीत, म्हणून विश्वस्तांनी तसे करणे स्वाभाविक होते. याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्याने ते नियम पाळून मंदिरात प्रवेश करणे अपेक्षित होते. अर्थात त्यांना मंदिरात जाऊ दिले न दिल्याचा राग मनात धरून त्या पोलीस अधिकाऱ्याने टाळेबंदीत मंदिर सुरू असल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. यातून पोलिसांतील कोत्या मनोवृत्तीचे दर्शन सामान्यांना घडले.

गेल्या  रविवारी सोनसाखळी चोरांचा सुगावा लागल्यानंतर बोईसरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पालघरजवळील कोळगाव येथे छापा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापैकी तीन गुन्हेगारांनी चॉपरचा धाक दाखवून त्यांनी पलायन केले. पोलिसांचा फौजफाटा सायंकाळी दाखल झाला. तोवर गुन्हेगार पसार झालेले होते. इतकेच नव्हे तर त्यापैकी एक गुन्हेगार त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पालघर शहरात आणि पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ येत असल्याची खबर गुन्हा अन्वेषण विभागाला मुलीच्या नातेवाईकांनी दिली. त्यानंतर त्यासंदर्भात पालघर पोलिसांना सूचित करण्यात आले नव्हते. त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात ठेवणे आणि इतर तांत्रिक पद्धतीने तपास करण्याऐवजी पोलिसांनी फाजील आत्मविश्वास ठेवत कारवाईत गाफिली दाखवली. हा गुन्हेगार प्रत्यक्षात दाखल झाल्यानंतर नागरिकांनी त्याला तारेने बांधून ठेवले. मात्र बोईसरहून पोलीस पथक येण्यास विलंब झाल्याने मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या धाडस मातीमोल ठरले.

नागरी वस्तीमध्ये पुन्हा एकदा चॉपरचा वापर झाला व गुन्हेगारांनी एक दुचाकी पळवून पलायन केले. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादासाठी धडपड सुरू आहे. वृत्तपत्रात याबाबत लिहून आल्यानंतर पोलिसांनी जोराची शोधमोहीम हाती घेतली, मात्र हा सारा देखावाच ठरला.

करोना काळापासून दुचाकीस्वारांच्या कागदपत्रांची तपासणी व नाकाबंदी करणे हा जणू नित्यक्रम झाला आहे. त्यामुळे उगाच फेरफटका मारायला बाहेर पडणाऱ्या तरुणाईवर लगाम लागला हे खरे. तरीही पोटापाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी हा जाच ठरत आहे. पुन्हा सुरु अभियानात रिक्षा व रिक्षा-टॅक्सीमधील प्रवासी संख्येवर निर्बंध लावण्यात आल्याने रिक्षाचे भाडे वाढविण्यात आले. तरी आसन मर्यादेचे सर्रास उल्लंघन होताना हेच नाकाबंदी करणारे पोलिसांनी सोयीस्करपणे काळा चष्मा घालत असल्याचे दिसून आले.

शहरांमध्ये रस्त्यालगत वा रस्त्यांवर वाहने उभी केल्यास दंडाची रक्कम वसूल केली जाते. वाहतूक पोलिसांचे ते कर्तव्यच आहे. परंतु शहरात दिवसा प्रवेश करण्यास अवजड वाहनांना बंदी असतानाही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. रिक्षा-टॅक्सी यांना पोलिसांकडून झुकते माप दिले जाते असे वारंवार दिसून आले. पोलिसांच्या कारवाईबाबत कोणालाही आक्षेप नसला तरी त्यामध्ये सातत्य असावे तसेच दुजाभाव नसावा अशीच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पालघर पोलीस पूर्ण करू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.