News Flash

पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचा जीव वाचवला

पुराच्या पाण्यात विविध ठिकाणी अनेकजण अडकले होते

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये काल रात्रीपासून अचानक पणे सुरु झालेल्या मुसळधार पावसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या २२ नागरिकांचा जीव वाचवण्यास पालघर पोलीस दलाला यश आले आहे. पोलीस विभागाच्या विविध ठिकाणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अंधारामध्ये बचावकार्य हाती घेतले होते.

पालघर जिल्ह्यात आज सरासरी २६५.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी डहाणू तालुक्यात ४६५ मिलिमीटर, तलासरी तालुक्यात ४२३ मिलिमीटर, पालघर तालुक्यात ३८०, वाडा तालुक्यात २२२ तर वसई तालुक्यात १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जोरदार वारा व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते.  या पार्श्वभूमीवर विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले होते. अनेक ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी रस्त्यावर असलेले अडथळे दूर करून पोलिसांना बचावकार्यासाठी पोहोचावे लागले. तसेच पोलिसांनी काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक व जनजीवन सुरळीत करण्यातही मोलाची भूमिका बजावली.

तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडीपाडा या ठिकाणी नदीचे पुराचे पाणी घरात शिरले आणि सात जणांचा जीव धोक्यात आला होता. कासा पोलीस ठाण्याचे लिलकापाडा येथील शेतात राहणारी पाच वर्षाची मुलगी पुरात वाहून गेली होती, तिला पोलीस पथक पथकाने वाचवले. केळवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत माकुणसार गावाच्या जवळ असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या जवळ खारटन भागात एक दांपत्य शेतावरील घरामध्ये अडकले होते, तसेच घोलवड पोलीस स्टेशन यादीमध्ये झाई व वेवजी रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांचा महत्वपूर्ण वाटा होता. पालघर-माहीम रस्त्यावर पाणी साईबाबा नगर येथे पुराचे पाणी वाढल्याने झाडावर अडकून बसलेल्या व्यक्तीची पोलिसांनी सुटका केली, तर सफाळे लालठाणे हद्दीत रस्त्यावर पडलेल्या माती दगडाचा ढिगारा बाजूला सारण्यात पोलिसांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.

मुसळधार पावसामुळे आज पालघर महावितरण विभागात एकूण-११७ वीज वाहिन्याxमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अंदाजे २ लाख ५१ हजार ९९८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे वीज वाहिन्या वर पडून आज महावितरणचे १३ लघु दाब वाहिनींचे व १६ उच्च दाब वहिनींच्या खांबांचे व पाच वितरण रोहित्रांचे नुकसान झाले. तसेच ३३/११ के. व्ही. डहाणू व देडाले उपकेंद्रातील ५ एम. व्ही. ए. येथील रोहित्रात बिघाड झाला.

वीजपुरवठा खंडित झालेल्या ११७ वीज वाहिन्या पैकी १०७ वीज वाहिन्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दहा वीज वाहिन्याचा वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम सुरू आहे. पाऊस, वारा व पाणी साचल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत आहेत.

उर्वरित अंदाजे २७ हजार ७१२ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंता किरण नागांवकर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 7:58 pm

Web Title: palghar police saved 22 lives msr 87
Next Stories
1 कोल्हापूरवर महापुराचं सावट; करोना व पूर दोन्ही संकटं एकाचवेळी!
2 कोल्हापुरवर पुन्हा महापुराचं संकट?; पंचगंगा नदी इशारा पातळीकडे
3 पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून ३१ ऑगस्‍ट करावी : सुधीर मुनगंटीवार
Just Now!
X