26 January 2021

News Flash

पतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले

अवघ्या चार दिवसांत हत्याकांडाचा छडा

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

अवघ्या चार दिवसांत हत्याकांडाचा छडा

पालघर : पतपेढीच्या कार्यालयासमोरच असलेल्या इंग्रजी भाषा शिकवणी (इंग्लिश स्पीकिंग कोर्स) चालवणाऱ्या संचालकाने आपला अपराध लपविण्यासाठी श्री अष्टविनायक पतपेढीच्या ५७ वर्षीय व्यवस्थापिका साधना चौधरी यांची हातोडय़ाने ठेचून हत्या केली असल्याचे गूढ उघडकीस आले आहे.

शनिवारी संध्याकाळी पालघर शहरातील ओम शांती देवा इमारतीत असलेल्या या पतपेढीच्या व्यवस्थापिका यांची हत्या या आरोपीनेच केली असल्याची कबुली पोलिसांना दिली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पतपेढीत काम करीत असलेल्या रोखपाल हिचे समोरील शिकवणीच्या संचालकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. यातून दोघांनीही फायदा उचलत पतपेढीतील रोख रक्कम अनेक वेळा लंपास केली होती. ही रक्कम सुमारे ८० हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती व्यवस्थापिका साधना चौधरी यांना कळाली व त्यांनी या आरोपीला याबाबत विचारणा केली. मात्र आपले बिंग फुटेल व बदनामी होईल ही भीती आरोपीला होती. आरोपी शिकवणीशिवाय सुतार काम करत असल्याने शनिवारी संध्याकाळी कार्यालयात असलेला हातोडा आणून त्याने चौधरी यांच्या डोक्यात घाव घालून हत्या केली.

ही हत्या झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे रवींद्र पाखरे, श्रीकांत कोळी, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या विविध पथकांमार्फत तपास सुरू केला.

यामध्ये अनेक जणांचे जाबजबाब नोंदले गेले. यामध्ये या आरोपीचाही समावेश आहे. मात्र आरोपीने संशयास्पद जाबजबाब दिल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली व अखेर त्यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व या हत्येचे गूढ सोडवले. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पतपेढीतील रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी लेखा महानिरीक्षकांचा अभिप्राय मागवला असून यात दोषी आढळल्यास आरोपी व सहआरोपीवर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:17 am

Web Title: palghar police solved mystery of credit society manager murder zws 70
Next Stories
1 उपचाराच्या नावाखाली जिवाशी खेळ
2 यंदाची संक्रांत महागाईमुळे कडवट
3 तारापूरमधील २२५ कारखान्यांवर संक्रांत
Just Now!
X