कर्मचाऱ्यांना परत बोलविण्यासाठी व्यावसायिकांची धडपड

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : राज्य शासनाने उपाहारगृह सुरू करण्याची परवानगी अलीकडेच दिली आहे. उपाहारगृह सुरू होत असताना त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची जमवाजमव करण्यासाठी उपाहारगृह व्यावसायिकांची धडपड सुरू आहे. काही उपाहारगृह मालक परराज्यात गेलेल्या आपल्या कामगारांना परत बोलावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून उपाहारगृहे, खानावळी, मद्यालये करोना प्रादुर्भाव पसरू नये यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या दरम्यान या सर्व आस्थपना बंद असल्याने येथे ग्राहकांना सेवा देणारे कर्मचारी, स्वयंपाकगृहात काम करणारे स्वयंपाकी, मजूर, सफाईगार आदी कर्मचारी गावी गेले. मात्र आता काही नियम अटी घालून उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांना परत बोलावण्यासाठी व्यावसायिकांची दमछाक होत आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून उपाहारगृहे बंद असल्याने व्यावसायिकांसह यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र पार्सल सेवेला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्याने सेवा देणारी उपाहारगृहे पुन्हा एकदा ठप्प झाली.

अनेक अडचणींनंतर आता उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर बहुतांश उपाहारगृहे व्यावसायिकांनी आपली बंद उपाहारगृहे उघडून डागडुजी, रंगकाम, आसनव्यवस्था, खबरदारीची उपाययोजना अशी अनेक कामांना सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांपासून उपाहारगृहे सुरू झाल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असला तरी पुढे ग्राहकसंख्या वाढून या व्यवसायाला नवी उभारी मिळेल व यातून अनेक हातांना पुन्हा एकदा रोजगार प्राप्त होईल अशी आशा उपाहारगृह चालक-मालकांनी व्यक्त केली.

उपहारगृहे सुरू झाली असली तरी ग्राहकांना सेवा देणारे कर्मचारी, स्वयंपाकगृहात काम करणारे कर्मचारी नसल्याने व्यावसायिकांसमोर प्रश्न पडला आहे. तोकडय़ा कर्मचारीवर्गावर सध्या उपाहारगृहे सुरू ठेवली जात आहेत. कर्मचाऱ्यांना बोलावण्यासाठी उपाहारगृह व्यावसायिकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र कर्मचारीवर्गाकडे परतण्यासाठी पैसे नसल्याने येथून पैसे पाठवून त्यांना परत बोलावण्याचे प्रयत्न सूरू आहेत. काही व्यावसायिकांनी बस, रेल्वेची तिकिटे काढून दिली आहेत. वसईत तर कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाने परत बोलावले जात आहे.

‘वेळ वाढवून द्या’

राज्य शासनाने उपाहारगृहे सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी तेथील स्थानिक प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपाहारगृहे उघडी ठेवण्याची वेळ ठरविण्याचा निर्णय आहे.  जिल्ह्यत संध्याकाळी सातपर्यंत वेळ दिली असली तरी ही वेळ रात्री नऊ ते दहापर्यंत वाढविण्याची मागणी उपाहारगृहे असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

अनुभवी कर्मचारी नसल्याने त्यांना परत बोलावण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. ऑनलाइन पैसे पाठवून, बस, रेल्वे तिकिटे काढून त्यांना बोलावले जात आहे. ते आल्यास त्यांना रोजगार प्राप्त होईल व ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. शासनानेही आमची अडचण समजून घ्यावी.
– के. भुजंगा शेट्टी, माजी अध्यक्ष, पालघर हॉटेल्स ओनर्स असोसिएशन