वाडा-तिळसा रस्त्यावर खड्डे असल्याने तिळसेश्वर भाविकांचा जीवघेणा प्रवास

कासा : वाडा तालुक्यातील तिळसा येथील तिळसेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शन घेतात. मात्र वाडा ते तिळसा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने भाविकांना खडतर प्रवास करून शिवदर्शन घ्यावे लागणार आहे. तिळसेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक जमत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यातील तिळसे येथे वैतरणा नदीवर असलेल्या पुरातन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्रा भरत असते. सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. शुक्रवारी महाशिवरात्री यात्रेकरिता मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असले तरी या मंदिराकडे जाणारा वाडा ते तिळसा-खर्डी या मार्गाची दुरवस्था झाली असून प्रचंड खड्डे पडल्याने शिवभक्तांची वाट खडतर बनली आहे.

वाडा तालुक्यातील तिळसेश्वर हे शिवमंदिर अत्यंत प्राचीन असून नदीपात्राच्या मध्यभागी आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकसह गुजरात राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अनेक भाविक या दिवशी पायात चप्पल न घालता पायी येत असतात. मात्र यावर्षी या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही खड्डे भरत मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला असला तरी यावर टाकलेल्या खडीने तर रस्ता अधिकच धोकादायक बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर वाहने थांबवली जात असल्याने भाविकांना या खडीवरूनच चालत जावे लागणार आहे.

वाडा ते तिळसा रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे एकाचवेळी हजारो वाहने आल्याने रहदारीचा प्रश्न अधिक गंभीर बनणार असून वाहतूक कोंडी होण्याचा धोका अधिक आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचीही भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

महाशिवरात्रीनिमित्त तिळसेश्वर यात्रा भरत असल्याने लवकरात लवकर खड्डे बुजवून द्या, अशी मागणी आम्ही काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. – सुभाष आगिवले, ग्रामस्थ