पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज (रविवार)सकाळपासून भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसल्याने पुन्हा येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, ११ वाजून ३९ मिनिटांनी ३.१ तीव्रतेचा, दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी  २.१ तीव्रतेचा, सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, सायंकाळी ५ वाजून ८  मिनिटांनी २.३ तर सायंकाळी ५ पाच वाजून २३ मिनिटांनी ३.२ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. तर, सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी पुन्हा ३.१ तीव्रतेचा धक्का जाणवला.

या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते व केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती. तीन पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप व डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून, गेले काही महिने त्याची तीव्रता वाढण्याचे प्रकार कमी झाले होते. या भूकंपामुळे नुकसान झाल्या बद्दलची माहिती अजूनही प्राप्त झाली नाही.