News Flash

जिल्ह्य़ातील ताडी व्यावसायिक हतबल

प्रलंबित समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; आंदोलनाचा पवित्रा

(संग्रहित छायाचित्र)

पालघर जिल्ह्यातील ताडी व्यावसायिकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर शासनाने तोडगा न काढल्यामुळे जिल्ह्यातील ताडी सहकार डबघाईला आले आहे. त्यामुळे  व्यावसायिकांच्या सहकारी संस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पालघर जिल्ह्यात ताडी विक्री हा येथील शेतकरी, बागायतदार यांचा जोडधंदा आहे.  ठाणे जिल्हा असताना १९६८ पासून भंडारी समाज ताडी व्यवसाय करीत आहे. त्यातूनच ताडी सहकार क्षेत्र उभे केले गेले. सद्य:स्थितीत सातपाटी, वडराई, माहीम या तीन सहकारी संस्था सहकार क्षेत्र टिकविण्यासाठी धडपड करीत आहेत. येथील नीरा आजही प्रसिद्ध आहे. ताडी व्यवसायाच्या माध्यमातून शासनाला चांगला महसूलही मिळत आहे. त्यानंतरही ताडी व्यावसायिकांच्या जिद्दीने उभ्या असलेल्या या सहकार क्षेत्राला शासन सहकार्य करीत नसल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे  सहकार क्षेत्राला आता उतरती कळा लागली आहे. शासनाच्या ताडी विक्री परवानाबाबतच्या बदलत्या व उदासीन धोरणाचा फटका या सहकारी संस्थांना बसत आहे. या व्यवसायात परप्रांतीय ताडी व्यावसायिक शिरकाव करून स्थानिक ताडी व्यावसायिकांना उद्ध्वस्त करीत आहेत. ताडीमध्ये भेसळ करून पोषक पेय असलेल्या ताडीला नशेचे पेय बनविण्याचा गोरखधंदा जोर धरत आहे. गेल्या अनेक वर्षांत शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक संस्थांना टाळे लागले आहे, असे व्यावसायिक सांगतात.

..अन्यथा आंदोलन

ताडी सहकारी संस्थांना ताडी योजना परिपत्र ११ जुलै १९६१ नुसार सर्व सोयी सवलती मिळाव्यात, सहकारी अधिनियम १९६० चे कलम ४२ मधील अ, ब, क नुसार संस्थेकडून लायसन्स फी वसूल करू नये. तसेच केलेली वसुली परत मिळावी, जाहीर लिलावातून संस्थांना वगळावे व त्यांची दुकाने (बीअर शॉप मालकीनुसार) त्यांनाच कायमस्वरूपी द्यावी, हा निर्णय होईपर्यंत लिलाव झाल्यास पूर्ववत १/४ ची सवलत द्यावी, शेती व्यवसायाशी निगडित असलेल्या ताडी व्यवसायाला शेती व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी, अन्य संस्थांप्रमाण अनुदान द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या असून आता अनेक प्रयत्नानंतरही  मागण्या मान्य होत नसल्यास साखळी उपोषण, मोर्चे, आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मंत्र्यांना निवेदने तरीही समस्या कायम

तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री दादासाहेब भुसे अशा डझनभर मंत्र्यांना आतापर्यंत निवेदने देण्यात आली आहेत. त्यानंतरही ताडी व्यवसायिक भंडारी समाजाच्या समस्या आजही आहे त्या स्थितीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 12:10 am

Web Title: palghar tadi professional frustrated in the district abn 97
Next Stories
1 कवडास धरणाची उंची वाढविण्यास ग्रामस्थांचा विरोध
2 वसई एसटी आगार धोकादायक
3 माता-बाल संगोपन केंद्राचा प्रयोग यशस्वी
Just Now!
X