आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत यासाठी डहाणूच्या प्रकल्प अधिकारी यांनी ‘शाळा बंद, पण शिक्षण आपल्या दारी’ या उपक्रमाची आग्रही अंमलबजावणी सुरू केल्याने चार तालुक्यांतील सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षक पोहोचून शिकवू लागले आहेत.

करोना संक्रमणाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यालय क्षेत्रातील २१ अनुदानित व ३४ शासकीय अशा ५५ आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा सुरू करणे आव्हानात्मक असल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी जून २०२० मध्ये मार्गदर्शक सूचना जारी करून ‘अनलॉक लर्निग’ सुरू ठेवण्याचे उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते.

पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यतील डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यक्षेत्रात काही अतिदुर्गम भाग असल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावपाडय़ावरील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजावावे यासाठी डहाणू प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रोत्साहित केले.

तंत्रस्नेही शिक्षकांचे वेगवेगळे गट बनवून पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विषयांच्या चित्रफितीचे संकलन व एकत्रीकरण करण्यात आले. शिक्षकांकडे असलेल्या लॅपटॉप, मोबाइल, प्रोजेक्टर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात व पाडय़ात विद्यार्थ्यांचे लहान गट तयार करून अंगणवाडी, समाज मंदिरे, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत असे छोटेखानी अभ्यासवर्ग सुरू झाले आहेत. प्रत्येक शिक्षकाला दहा ते पंधरा पाडय़ांची जबाबदारी देण्यात आली असून अशा पद्धतीने विद्यादान करताना शिक्षकांना ठिकाण, तारीख, वेळ यांचे रिअल टाइम फोटो काढून अधिकाऱ्यांना द्यावयाचे आहेत.

करोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याबाबतचा कल कमी झाला असून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती राखण्यासाठी तसेच शिक्षणाबाबतची ओढ कायम ठेवण्यासाठी त्यांना गुंतवून ठेवणे आवश्यक असल्याने हा उपक्रम राबवण्याकडे प्रकल्प अधिकारी यांनी विशेष लक्ष दिले आहे. या उपक्रमात त्या स्वत:देखील सहभागी होत आहेत.

करोना परिस्थितीत पोलीस, डॉक्टर, परिचारिका, प्रशासन सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन कर्तव्य बजावत असताना नव्या पिढीला घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात राहण्यासाठी ‘अनलॉक लर्निग’मध्ये कर्तव्य बजावणे अपेक्षित असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी मत व्यक्त केले आहे. या योजनेला प्रथमत: काही शिक्षक व गावांमधून काही प्रमाणात विरोध झाला असला तरी सद्य:स्थितीत डहाणू प्रकल्प अधिकारी क्षेत्रातील तीस हजार विद्यार्थी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या  संकटकाळात पूर्ण देश एकजुटीने लढत आहे. या परिस्थितीतही पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, प्रशासन, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका कर्तव्य बजावत असताना शिक्षकांनीही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निगसाठी योगदान द्यावे आणि हा उपक्रम यशस्वी करावा.

– आशिमा मित्तल (भा.प्र से.), प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि. प्र. डहाणू