रमेश पाटील

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र पालघर हे शासकीय कृषी संशोधन केंद्र पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे.  येथे कृषी संशोधन आणि विस्ताराचे कार्य चालते. मात्र, गेल्या सहा वर्षांत शेतपिकांवरील कीडरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी तसेच नवनवीन पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी या केंद्रात शास्त्रज्ञच नसल्याची बाब उघड झाली आहे.

शेतकऱ्यांना बियाणे पुरविणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे, पिकावरील कीड आणि रोगांबद्दल मार्गदर्शन करणे, त्यांच्या बियाण्याबाबतीत तक्रारींचे निवारण करणे इत्यादी कामे कृषी संशोधन केंद्र कार्यालयातून केली जातात. मात्र गेल्या सहा वर्षांंपासून पालघर येथील संशोधन केंद्रावर भात पैदासकार, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, चारसूत्री पीक शास्त्रज्ञ इत्यादी महत्त्वाच्या शास्त्रज्ञांची पदे रिक्त आहेत.

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात आणि इतर पिकांबाबतच्या भेसळ आणि कीडरोग याबाबतच्या तक्रारींचे योग्य ते निवारण होत नाही. पालघर जिल्ह्यात भात हे एकमेव पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. या पिकासाठी बाहेरून आलेले संकरित महागडे वाणांचे बियाणे शेतकरी खरेदी करतात. मात्र, येथील शेतकऱ्यांसाठी कुठलेही स्थानिक नवीन भाताच्या वाणांचे संशोधन झालेले नाही.

पालघर जिल्ह्यातील मुख्य पीक भात असल्याने आणि आधीच भातशेती तोटय़ात असल्याने शेतकरी कठीण परिस्थितीत कर्ज घेऊन विविध बियाणे निर्मात्या कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतो. हे बियाणे शेतात लावल्यानंतर पिकातील भेसळ, निकृष्ट  उगवण, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होते. त्यावेळी हे शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. त्यानंतर त्या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभाग, पंचायत समिती आणि कृषी संशोधन

केंद्र पालघर येथील संबंधित शास्त्रज्ञ यांची समिती तयार करून शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाची तपासणी केली जाते. परंतु कृषी संशोधन केंद्र पालघरकडे गेली सहा वर्षे संबंधित विषयातील विषय तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे योग्य ते निवारण होत नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे

निवारण होत नसल्याने झालेल्या नुकसानीचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संशोधन केंद्राने वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी संशोधन केंद्र पालघर आणि डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ यांच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्र्यांना साकडे

पालघर जिल्ह्यात भात, चिकू, नारळ व भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील शेतीला अधिक फायदेशीर ठरावे, यासाठी जिल्ह्यात कृषी महाविद्यालय उभारण्याची आवश्यकता असल्याने तशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून कार्यरत असणारे दादा भुसे यांच्याकडेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे त्यांनी या मागणीचा विचार करून जिल्ह्यासाठी कृषी महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाताचे कोठार म्हणून पालघर जिल्ह्य़ाची ओळख आहे. ती कायम राहणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पालघर कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांची रिक्त पदे असली तरी शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींची दखल तात्काळ घेऊन उपाय योजना करण्यात येतात.

-सचिन पाटील तेलंगे, उपविभागीय व्यवस्थापक बीजोत्पादन