नीरज राऊत

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू झाल्यानंतर काही उद्योगाने नाल्यांमध्ये प्रक्रियेविना पाणी सोडण्याचे परिणाम लागलीच दिसून आले आहेत. बोईसर जवळच्या दांडी-नवापूर खाडीमध्ये हजारोच्या संख्येने मासे मेल्याचे दिसून आले.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अधिकांश उद्योग मार्च महिन्याच्या तिसरा आठवड्यापासून बंद होते. गेल्या काही दिवसांपासून येथील रासायनिक व टेक्स्टाईल उद्योगांनी आपले उत्पादन सुरू केल्याने सांडपाण्याची निर्मिती वाढली आहे. त्यामध्ये भर घालण्यासाठी काही उद्योगाने खुल्या गटारांमध्ये सांडपाणी सोडत असल्याचे निदर्शनास आले होते. हे सांडपाणी नवापूर दांडी खाडीमध्ये मिसळले गेल्याने गेल्या दीड महिन्यापासून स्वच्छ असलेल्या खाडीतील पाण्याला रासायनिक रंग प्राप्त झाला.

पाण्यामध्ये मिसळलेल्या रसायनांच्या मुळे खाडीमध्ये असलेले लहान व मध्यम आकाराचे बोई मासे मृत पावल्याचे दिसून आले आहे. या घटनेची दखल घेण्यासाठी येथील मच्छीमार मंडळींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तक्रार नोंदवली आहे. तारापूर येथील उद्योग सुरू झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून खाडीतील चवदार मासे खाणाऱ्या ग्रामस्थांना आता असे मासे मिळण्याची शक्यता दुर्लभ होणार असल्याचे दांडी येथील तरुण मच्छीमार कुंदन दवणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.