News Flash

भाजपा कार्यकर्त्याकडून तुंगा कोविड रुग्णालय व्यवस्थापकाला मारहाण; साहित्याची तोडफोड

बिल कमी करण्यावरून वाढला वाद

याच रुग्णालयात भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी येथे असलेल्या तुंगा या खाजगी कोविड उपचार रुग्णालयातील व्यवस्थापकाला बिलाच्या रकमेतील वादावरून भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येत असून, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

राज्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सुरू करण्यात आलेली आहेत. तर काही कोविड उपचार केंद्रही निर्माण करण्यात आलेली आहेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी येथे असलेल्या तुंगा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेतलेल्या एका करोना रुग्णाच्या उपचारानंतर बिलाच्या रक्कमेवरून वाद झाला.

यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी भाजपाच्या एका स्थानिक नेत्याला रुग्णालयात बोलविले. बिलाची रक्कम कमी करण्याची मागणी करत असताना, या कार्यकर्त्याने रुग्णालयातील संगणक व इतर साहित्याची मोडतोड केल्याचं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच रुग्णालयाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात ठेवून देत मारहाण केल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

हा प्रकार घडल्यानंतर ३५ रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मारहाण करणाऱ्या भाजपाचे स्थानिक नेते प्रशांत संखे याला बोईसर एमायडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोईसर पोलिसांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 4:57 pm

Web Title: palghar tunga covid hospital bjp members attacked hospital manager bmh 90
Next Stories
1 मोठी बातमी…..मुंबईतलं युरेनियम प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!
2 “अजितदादा म्हणाले होते, पंढरपुरात असा कोण माईचा लाल निवडून येईल…”, गोपीचंद पडळकरांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा!
3 “करोना उपाययोजनांपेक्षा पब्लिसिटी स्टंटकडेच यांचं लक्ष”; प्रवीण दरेकरांनी सरकारला फटकारलं!
Just Now!
X