निखील मेस्त्री

पालघर जिल्ह्याला शैक्षणिक व आरोग्य दृष्टय़ा सक्षम करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य विभाग मनुष्यबळाअभावी कमकुवत झाले असून हे विभाग गेल्या सहा वर्षांपासून उपलब्ध मनुष्यबळावर कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी कामाच्या वाढत्या बोजाने मेटाकुटीला आले आहेत.

१४ ऑगस्ट २०१४ ला पालघर जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा स्थापन झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषद व त्याच्याशी निगडित असलेले विविध प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या या विविध विभागांमध्ये शिक्षण व आरोग्य विभाग सर्वात महत्त्वाचा व जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचे अंग मानले जाते. मात्र सुरुवातीपासूनच या दोन्ही विभागात मनुष्यबळ कमतरता असल्याने हे दोन्ही विभाग सद्यस्थितीत उपलब्ध कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण आहे.  शिक्षण विभागात वीस टक्कय़ांहून अधिक तर आरोग्य विभागात सुमारे पन्नास टक्के रिक्त पदे असल्याने आता असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. परिणामी आरोग्य व शिक्षण संदर्भ सेवा पुरवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

पालघर जिल्ह्यात कुपोषण मोठय़ा प्रमाणात आहे. या कुपोषणावर मात मिळवण्यासाठी महिला व बाल विकास विभागासह आरोग्य विभागाचा मोठा वाटा आहे. मात्र सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे कुपोषण निर्मूलनाचे काम संथगतीने सुरु आहे. भविष्यात हे काम असेच  संथगतीने सुरू राहिल्यास जिल्ह्यातील कुपोषण आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची महत्त्वाची भूमिका असली तरी शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण विभागाची मोठी जबाबदारी ग्रामीण भागात आहे. शाळांसह माध्यमिक विद्यालय, विद्यालये आदींवर देखरेख ठेवण्याचे काम शिक्षण विभाग करीत असते. त्यातच शिक्षकांचे पगार अनुदानित महाविद्यालयांची विविध शिक्षण विषयक कामे, तुकडी वाढ प्रस्ताव, अशी अनेक कामे शिक्षण विभागाला करावी लागत आहेत. याच बरोबरीने ग्रामीण भागात माध्यमिक व विद्यालया मधून शिक्षण देण्याचे काम शिक्षकांमार्फत केले जात आहे. असे असताना शिक्षण विभागात २० टक्कय़ाहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात मनुष्यबळ असणे आवश्यक असून या दोन्ही विभागाची पदे तातडीने भरावीत अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

पदे

शिक्षण विभाग

* मंजूर  –  ७८८२

* कार्यरत  —   ५८४२

* रिक्त पदे —  २०४०

* रिक्त पदे टक्केवारी — २६%

आरोग्य विभाग

* मंजूर  — ११६६

* कार्यरत — ६८६

* रिक्त  — ५८०

* रिक्त टक्केवारी —  ४९%

आरोग्य व शिक्षण विभाग जिल्ह्यासाठी महत्वाचा विभाग आहे. या विभागातच कर्मचारी संख्या कमी असल्याने याचा विपरीत परिणाम शिक्षण व आरोग्य संदर्भ सेवा देताना होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पदे तात्काळ भरवीत अशी मागणी शासनाकडे केली आहे.

– निलेश सांबरे, उपाध्यक्ष, जि. प.पालघर