तब्बल १२ लाखांची लाच घेताना एका आयएएस अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी शाळेतील कर्मचाऱ्यांकडून ही लाच घेण्यात येत होती.

आदिवासी कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गावडे (वय ५४) असे आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून याकामी त्यांना मदत करणारे ३९ वर्षीय उपजिल्हाधिकारी किरण माळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावडे आणि माळी यांनी आदिवासी शाळेतील १२ कर्मचाऱ्यांकडे लाचेची मागणी केली होती, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जर या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक लाख असे १२ लाख दिले नाहीत तर त्यांची पदोन्नती रोखण्यात येईल, अशी धमकी या दोघांनी दिली होती, असे तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा गावडे व माळी यांनी त्यांना प्रत्येक २ लाख रूपयांची मागणी केली होती. नंतर त्यांनी तडजोड करत रक्कम कमी केली व प्रत्येकी १ लाख रूपये देण्यास सांगितले होते.
त्यानंतर तक्रारकर्त्यांनी एसीबीशी संपर्क साधून तक्रार केली. प्राथमिक चौकशीनंतर एसीबीने शनिवारी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माळी यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तिथे आणखी १२ लाख रूपये आढळून आले. ही रक्कम ही लाचेची असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत माळी आणि गावडे यांच्या घराची कसून तपासणी करण्यात येत होती. आज या दोघांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.