संदीप आचार्य/ नीरज राऊत

पालघर जिल्ह्यत दोन वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात बालमृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ’बालमृत्यू झाले तर असू दे’ या आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या उद्गारानंतर निर्माण झालेले वादळ शमविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्ती केली. त्याला दीड वर्ष उटलल्यानंतरही पालघर जिल्ह्यतील अनेक आदिवासी पाडे आजही कुपोषणाच्या विळख्यात आहेत. जवळपास तीन हजार बालके आजही कुपोषित श्रेणीत आहेत. बालरोग तज्ज्ञांसह डॉक्टर व परिचारिकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त असून ‘टास्क फोर्स’ हा ‘कॉमेडी फोर्स’ बनल्याची टीका श्रमजीवी संघटना व राज्य अंगणवाडी संघटनेने  केला आहे.

मोखाडय़ातील २० बालमृत्यूनंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकतीच मोखाडय़ात धाव घेऊन तेथील परिस्थितीचा आढवा घेतला व मदत कार्य करण्याबरोबर रिक्त पदे भरण्याचा आदेश दिला.टास्क फोर्सची नियुक्ती झाल्यापासून दीड वर्षांत टास्क फोर्सच्या डझनभर बैठका झाल्या. आरोग्यमंत्र्यांनीही अनेक बैठका व दौरे केले. यातून नेमके काय साध्य झाले, असा सवाल केला जात आहे. एवढय़ा बैठका होऊनही डॉक्टरांची ३१ पदे रिक्त आहेत तर परिचारिकांची ४१ पदे भरण्यात आली नाही. सोनोग्राफीपासून अनेक उपकरणे नाहीत. भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञांसह परिचारिका नाहीत. जव्हार वगळता बाकीच्या रुग्णालयांमध्ये बालकांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था नाही. पालघर जिल्ह्यची निर्मिती झाल्यानंतर शासकीय कार्यालये वाढली तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता डॉक्टरांची कितीतरी जास्त पदे भरण्याची गरज असल्याचे येथील डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

पालघर जिल्ह्यत तीन हजाराहून अधिक अंगणवाडय़ा असून यात सात महिने ते सहा वर्षांपर्यंत दोन लाख ९० हजार बालके आणि मोठय़ा प्रमाणात स्तनदा व गर्भवती मातांना पुरक पोषण आहार व अमृत आहार योजनेच्या माध्यमातून अंडी, केळी तसेच डाळीसह पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाणे टेक होम रेशन अंतर्गत आहार दिला जातो. यानंतरही पालघर जिल्ह्यतील वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड व पालघरमध्ये जवळपास तीन हजार बालके सॅम व मॅम अंतर्गत कुपोषित राहात असतील तर नेमका पोषण आहार कोणाला मिळतो, असा सवाल ‘राज्य अंगणवाडी कृती समिती’चे नेते एम. ए. पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या जव्हार वगळता बालकांसाठी अतिदक्षता विभाग नाही. गंभीरबाब म्हणजे केवळ पाच बालरोगतज्ज्ञांच्या जीवावर तीन हजाराहून अधिक कुपोषित बालकांच्या आरोग्याची जपणूक कशी होणार हा कळीचा मुद्दा असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

मोखाडय़ात २० बालकांचा कुपोषणाने मृत्यू

गेल्या नऊ महिन्यात मोखाडय़ात २० बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला असून २२१ बालके मृत्यूच्या दाढेत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. गेल्या सहा महिन्यात कुपोषणाचे ३४९ बळी गेले असून यात १६० अर्भकमृत्यू झाले तर १८९ बालमृत्यू झाले. मात्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केवळ २९ बालमृत्यू झाले असून जे मृत्यू झाले त्यात श्वसनाच्या आजारापासून वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तथापि आजही सुमारे तीन हजार बालके कुपोषित असून  यामागे ‘अमृत आहार योजना’ व ‘विशेष पोषण आहार योजना’ ही या कुपोषित बालकांपर्यंत तसेच गर्भवती व स्तनदा मातांमपर्यंत प्रभावीपणे पोहोचली नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटना व अंगणवाडी संघटनेकडून केला जात आहे.