लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : संत श्री गजानन महाराजांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याची ५२ वर्षांची परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. करोनाच्या आपत्तीमुळे ‘श्रीं’चा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने घेण्यात आला.

करोना विश्वाव्यापी संकटापुढे सर्वच हतबल झाले आहेत. करोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. अद्याापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. करोना महामारीचे संकट पहाता गत ५२ वर्षांपासून सुरू असलेला आषाढी वारी पालखी सोहळा यावर्षी रहीत करण्यात आल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानद्वारे प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

वारीतील सर्व अडचणी लक्षात घेता, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे. ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन नित्य पूजाअर्चा, सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम घेतले जातात. विठूरायाच्या चरणी नित्यसेवा भक्तिभावाने होत आहे. त्यामुळे ‘श्रीं’चा पालखी सोहळा रहीत करण्यात आला आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरला नेणे उचित ठरणार नसल्याचे संस्थानच्या व्यवस्थापकीय विश्वास्तांनी म्हटले आहे.