करोनाच्या संकटामुळे विविध नियम-बंधनात साजरी होत असलेल्या आषाढीसाठी प्रमुख संतांच्या पालख्या मोजक्या भाविकांसह मंगळवारी पंढरीत दाखल झाल्या. उद्या पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. आषाढीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आजपासून तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

दरवर्षी आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरीनगरी टाळमृदुंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात बुडून जाते. मात्र यंदा करोना महामारीमुळे या सोहळय़ावर निर्बंध आले आहेत. एरवी आषाढी वारीसाठी राज्य-परराज्यातून १० ते १२ लाख भाविक पंढरीत दाखल होत असतात. गर्दी आणि भक्तिमय वातावरणात पंढरीनगरी फुलून जाते. येथील मठ, धर्मशाला भजन-कीर्तनात बुडून जातात. शहरात व्यापाऱ्यांची लगबग तर प्रशासनाची कायदा व्यवस्थेपासून ते विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी धावपळ सुरू असते. यंदा मात्र या साऱ्यांपासून पंढरी मुक्त वाटते आहे. मानाच्या केवळ ९ पालख्या आणि त्या सोबत प्रत्येकी २० वारक ऱ्यांना विविध सूचनांचे पालन करत पंढरीत प्रवेश देण्यात आला आहे.

या मोजक्या वारक ऱ्यांसह आलेल्या सर्व मानाच्या पालख्या मंगळवारी पंढरीत आपआपल्या मठात विसावल्या आहेत. संचारबंदीमुळे शहरातील वारकरी, नागरिकांऐवजी केवळ जागोजागी बंदोबस्तासाठी थांबलेले पोलीस दिसत आहेत. एरवी आषाढीच्या पूर्वसंध्येला टाळमृदुंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात बुडून जाणारी पंढरी यंदा मात्र शांत भासत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

दरम्यान, बुधवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न होणार आहे. या वेळी त्यांच्या सोबत वारकरी म्हणून यंदा मंदिरातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला आहे. आषाढीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहरात ७ नवे करोनाबाधित

दरम्यान, गेले अनेक दिवस करोनामुक्त असेलल्या पंढरीत आषाढीच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचे संकट अवतरले आहे. दोन दिवसांपूर्वी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले होते. आज यामध्ये पुन्हा वाढ होत शहरात नवे ७ रुग्ण आढळून आले. यामुळे  एकूण बाधितांची संख्या ९ झाली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे आषाढीचे नियोजन तर दुसरीकडे करोनाचे नियंत्रण, शोधमोहीम, तपासणी कामाचाही ताण त्यांच्यावर वाढला आहे.