जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का आणि किरणकुमार (सत्यनारायण) यांना महाराष्ट्र पोलिसांनी केलेली अटक चुकीची असून त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली दंडकारण्याच्या वतीने ही मागण्यात करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या सुटकेसाठी मानविधार कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस चौकी परिसरातील पुन्नुर फाट्याजवळ एक पत्रक आढळलं असून त्यामधून ही माहिती समोर आली आहे.

तसंच पत्रकामध्ये २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान अमर शहिद सप्ताह साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. साम्राज्यवादी, दलाल, नोकरशाही, पुंजीपती वर्गाच्या विरोधात आमची पार्टी जनतेकरीता जनयुध्द करत असल्याचे उल्लेख आहे. चारु मुजुमदार, कन्हाई चटॅर्जीसारख्या १२५ कॉम्रेड्सने आपले जीवन या संघर्षाला समर्पित केल्याचा उल्लेख करीत खोट्या चकमकी दाखवून कॉम्रेरड्सना ठार केल्याचा उल्लेखही पत्रकात करण्यात आला आहे.

जहाल नक्षली नर्मदाला अटक, गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटाप्रकरणी होती आरोपी

गेल्या २२ वर्षांपासून भूमिगत असलेली जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का (६०) आणि तिचा पती किरणकुमार (५७) या दोघांना तेलंगण आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे हैदराबाद येथे अटक केली होती. या कारवाईने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे.

आंध्र प्रदेशचा प्रमुख नक्षलवादी किरण कुमार ऊर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा अगदी सुरुवातीपासून नक्षल चळवळीत सक्रिय होते. या जोडप्यावर छत्तीसगड सरकारने २० लाखांचे इनाम जाहीर केले होते. किरण कुमार हा दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा सदस्य (डीकेएसझेडसी) असून गडचिरोली जिल्हय़ाचा प्रभारी होता. छत्तीसगड राज्यात या दोघांची दहशत होती. किरण कुमार हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. नक्षलवाद्यांच्या (डीकेएसझेडसी) राजकीय अंग असलेल्या ‘प्रभात’ पत्रिकेचा तो संपादक होता. तांत्रिकदृष्टय़ा तो अतिशय सक्षम आहे तर त्याची पत्नी नर्मदा ही कृष्णा जिल्हय़ातील गुडिवाडा येथील रहिवासी आहे.

नर्मदाला कॅन्सरने ग्रासले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वीच किरणकुमार व नर्मदा हे दोघेही चळवळीतून बाहेर पडले. हैद्राबाद येथील कॅन्सर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ती उपचारांसाठी रुग्णालयात गेली होती. ही माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेलंगणा पोलीस तिच्या मागावर होतेच. मात्र,या दाम्पत्यावर तेलंगणा राज्यात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी नर्मदाची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली जिल्हय़ातील प्राणहिता पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक बन्सल हैदराबाद येथे पथकासह गेले व तिथेच या दाम्पत्याला अटक केली.

कोण आहे नर्मदा?
नर्मदा ही गडचिरोली जिल्हय़ातील सर्वात जुनी व वरिष्ठ नक्षलवादी होती. गडचिरोली जिल्हय़ातील अनेक नक्षल चकमकी, हत्या, जाळपोळ, हिंसाचारात तिचा सहभाग आहे. त्यामुळे तिच्यावर दक्षिण व उत्तर गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या बहुतांश सर्वच पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसूरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. या प्रकरणातही पुराडा पोलीस ठाण्यात नर्मदावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यातील बहुतांश गावात तिला ओळखले जाते. विशेष म्हणजे, रामको व शिल्पा या दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले त्या गुंटूरवाही गावातही नर्मदा सातत्याने जात होती, अशीही माहिती आहे.