पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात हँरिसन फॉली (पाचगणी थापा) येथून मोटार पाचशे फूट दरीत कोसळली. गाडीतून दोघे प्रवास करत होते. गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी महाबळेश्वर येथील ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे. या अपघातात एक महिला ठार तर एक जण जखमी झाला आहे.

दांडेघर (ता महाबळेश्वर) गावच्या हद्दीत पाचगणीहून वाईला येत असताना पसरणी घाटात हँरिसन फॉली येथून ही मोटार पाचशे फूट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पाचगणी येथील रेस्क्यू टीम व महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्स यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू करण्यात आले. दरीत उतरून गाडी पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अंधार, धुके आणि थंडीमुळे मदत कार्यात अडचण येत आहे. तसेच रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी आहे.

घटनेची माहिती मिळताच वाई पाचगणी पोलीस व महसूल अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित पोहोचले .गाडीतून कुमोद खटाव या मुंबईतील प्रवाशाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. तर एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून तिची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमी इसमास पाचगणी येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्रीमुळे मदत कार्य थांबविण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा शोध कार्य व गाडी बाहेर काढण्यात येईल असे पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे व महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित टिके व वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले घटनास्थळी उपस्थित होते.