News Flash

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात रणधुमाळी

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५० जिल्हा परिषदा आणि १०० पंचायत समित्यांचे मतदारसंघ आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नगर परिषद निवडणुकांत स्वबळाच्या नादात शिवसेना-भाजपला मिळालेल्या दणक्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेकडे पालकमंत्री, खासदार, आमदार असे संख्याबळ असूनही भाजपने नगर परिषद निवडणुकांत मिळविलेल्या यशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. यास्तव भाजपने शिवसेनेकडे पन्नास टक्के जागांची मागणी केली आहे. त्यामुळे युतीचे सूर तडजोडीत जुळतात किंवा कसे, यावरच निकाल अवलंबून आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५० जिल्हा परिषदा आणि १०० पंचायत समित्यांचे मतदारसंघ आहेत. शिवसेना-भाजप युती व्हायची झाल्यास भाजपला ५० टक्के जागा द्याव्या लागतील, असे भाजपचे प्रदेश प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी म्हटले होते. त्यामुळे शिवसेना अशा वाटाघाटीबाबत नेमका काय निर्णय घेते यावर सारे अवलंबून आहे.

शिवसेनेच्या निर्णायक मतदारसंघांवर भाजपने डोळा ठेवला असल्याने शिवसेना-भाजपमधील युतीची बोलणी निष्फळ व्हावीत म्हणून प्रयत्न कोणी तरी करत असल्याची टीका होत आहे. राजकीय पक्षातील बेडूकउडय़ा सुरू झाल्या आहेत. सध्या मनसे आणि राष्ट्रवादीला जिल्हात खमके नेतृत्व नाही त्यामुळे शिवसेना, भाजपची वाट काहींनी धरली आहे.

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीकडे चांगले बळ होते, पण सर्वाना घेऊन जाणारा नेता सध्या राष्ट्रवादीकडे जिल्ह्य़ात नाही. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या अन्य पक्षांत प्रवेश करत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यांच्या जिवावर काँग्रेसला यश मिळत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती होऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत घासाघीस होऊ शकते पण नगर परिषद निवडणुकीसारखे शिवसेना-भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे धोरण आखल्यास काँग्रेसला पूरक ठरेल.

शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक अशी मोठी ताकद असताना शिवसेनेची संघटना प्रबळ ठरली नाही. सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांची कामे होत नाहीत अशा तक्रारी आहेत. शिवसैनिकांना डावलून प्रवेश करणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार करण्यात येत असल्याने शिवसेनेत नाराजी आहे.

भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग भाजपची जबाबदारी आहे. ते सिंधुदुर्गचे सुपुत्र असले तरी डोंबिवलीचे आमदार आहेत. त्यांच्याशिवाय माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, अतुल काळसेकर असे भाजपचे शिलेदार आहेत. सिंधुदुर्ग भाजपकडे कार्यकर्त्यांची वानवा असली तरी सत्तेच्या बळावर कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो, पण त्यांची नाळ जनतेशी जुळलेली हवी, मात्र भाजपने जिल्ह्य़ातील नगर परिषदा, नगरपंचायत निवडणुकीत लक्षवेधक यश मिळविले आहे. त्याच बळावर भाजपने शिवसेनेकडे पन्नास टक्के जागा मागितल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील काँग्रेसची पर्यायाने नारायण राणे यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा विचार सेना-भाजपचा आहे. पण काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला असल्याने युतीला मोठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागणार आहे.

सिंधुदुर्गात ८२२ मतदानकेंद्रे आहेत. त्या सर्व केंद्रांवर पाच लाख ६३ हजार ५६५ मतदार आहेत. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १४२ मतदानकेंद्रांवर एक लाख तीन हजार ९०४ मतदार आहेत तर सर्वात कमी मतदार वैभववाडी तालुक्यात ३२ हजार ५५४ आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:29 am

Web Title: panchayat samiti elections in sawantwadi
Next Stories
1 सिंधुदुर्ग, जंजिरा किल्ल्याच्या पर्यटन करवसुलीसाठी पुरातत्त्व विभागाचा प्रस्ताव
2 ‘वाङ्मयचौर्य सिद्ध झाले, तर आपण लेखणी थांबवू’
3 कोकण विभाग शिक्षक मतदार संघ
Just Now!
X