अलिबाग पंचायत समितीच्या सभापती भारती थळे यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. थळे यांच्या राजीनाम्यामुळे चर्चाना मात्र ऊत आला आहे. त्यांच्या जागी आता विद्या म्हात्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.वास्तविक पाहता पंचयत समितीचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असताना भारती थळे यांनी वर्षभरानंतरच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय चर्चाना ऊत आला आहे. या राजीनाम्याला शेकापमधील गटबाजी जबाबदार असल्याचे बोलले जाते आहे. विद्या विलास म्हात्रे यांना सभापतीपद मिळावे यासाठी थळे यांचा राजीनामा घेण्यात आला असल्याचे बोलले जाते आहे.
 अलिबाग पंचायत समितीचे सभापतीपद इतर मागासवर्गीस महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी भारती थळे आणि विद्या म्हात्रे यांच्यात सुरुवातीपासूनच चुरस होती. मात्र त्या वेळी दोघीही या पदासाठी आग्रही होत्या. तेव्हा दोघींनाही सव्वा वर्ष असा पॅटर्न ठरवण्यात आला होता. मात्र सभापतीपद मिळाल्यानंतर भारती थळे यांनी आणि त्यांचे पती सुधीर थळे यांनी तालुक्यात आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता. त्यांच्या कामाचे कौतुकही सुरू झाले होते. मात्र यामुळे पक्षातील असंतुष्ट गटात मात्र नाराजीचा सूर होता. अखेर ही नाराजी टाळण्यासाठी थळे यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.
यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपणार असल्याने थळे यांनी राजीनामा तर दिला, मात्र या राजीनाम्यानंतर त्या तडक शहापूरला आपल्या गावी निघून गेल्या. वास्तविक पाहता सभापतीपदावर चांगले काम करता यावे आणि सभापतींना पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने अडीच वर्षांचा कालावधी ठरवून दिला आहे. मात्र जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी म्हणून शेकापने सव्वा वर्षांचा पॅटर्न काढल्याचे पक्षाच्या वतीने सांगितले जाते आहे. मात्र आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील सभापती असताना हा पॅटर्न का नव्हता, ते पाच वर्षे सभापती कसे होते, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सभापतींना काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे, असे मत शेकापच्याच एका जेष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या बोलीवर व्यक्त केले आहे.