कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मागील २४ तासांत सुमारे सहा फूट वाढ झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. यामुळे पंचांगेने धोका पातळी ओलांडली होती. अनेक नद्यांना पूर आला होता. नागरिकांचे स्थलांतर केले जात होते. एनडीआरएफचे पथक कार्यरत होते. गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

कालपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे. पावसाच्या वेग वाढल्याने राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत.

पंचगंगा नदीची काल सकाळी दहा वाजता पाणी पातळी ही २७ फूट इतकी होत. आज सकाळी दहा वाजता ती ३३ फूट आहे. पाणी पातळीमध्ये सुमारे सहा फूट वाढ झाली आहे. काल ४६ बंधारे पाण्याखाली होते, आज ही संख्या ५८ पर्यंत गेली आहे.