पंढरपूर : आजपर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले, ऐकले असतील. पण देवांचा विवाह असेल तर..! असाच एक विवाह सोहळा पंढरपूर येथे आज पार पडला आणि हे लग्नदेखील होते थेट श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे! वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी रंगणारा हा सोहळा आजही शाही पद्धतीने पार पडला. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि शाही वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, आजच्या या सोहळय़ानंतर वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख परिधान केला जाणार असून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुख्मिणी स्वयंवरात आहे. हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाजाकडून करण्यात येत होता. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात, तर उत्पात समाज उपासना मंदिरात हा सोहळा साजरा करून परंपरा जपत आहे. श्री विठ्ठल मंदिरात हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते. सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्र तर रुक्मिणीमातेस मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा, मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. साधारणत: सकाळी अकरा वाजता रुक्मिणीमातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला गेला. तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण झाली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अलंकाराने सजविलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आली. दोघांनाही मुंडावळ्या बांधल्या गेल्या, अंतरपाट धरुन उपस्थितांना फुले आणि अक्षता वाटप झाले आणि मग  वऱ्हाडींच्या उपस्थितीत मंगलाष्टकांना सुरूवात झाली. ‘आता सावध सावधान..’ ही मंगलाष्टक म्हणल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि टाळ—मृदुंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा साजरा केला. हा विवाह सोहळा झाल्यावर सायंकाळी दोन्ही मूर्तींची नगरात सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समिती सदस्यांसह हजारो भाविक उपस्थित होते.

विठ्ठलाची रंगपंचमी

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत विठ्ठलास रोज शुभ्र वेश परिधान करण्यात येतो. या काळात भगवंताच्या अंगावर दररोज गुलालाची उधळण केली जाते. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत म्हणजे एक महिना विठ्ठलाचीही रंगपंचमी सुरु राहते. या रंगपंचमी उत्सवाचा प्रारंभ आज वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला.