सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर पंढरपूरपासून जवळच देगाव येथे एसटी बस आणि मारूती युको मोटारीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील सहाजणांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. यातील मृत हे मुंबईच्या घाटकोपर भागात राहणारे होते. देवदर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना तेथे जवळच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

या अपघातात सुरेश कोकणे व त्यांच्या पत्नी सविता कोकणे यांच्यासह त्यांची दोन मुले सचिन आणि आर्यन अशा एकाच कुटुंबातील चौघाजणांना जीव गमवावा लागला. याशिवाय त्यांच्या सोबतच्या प्रथम सावंत आणि श्रध्दा सावंत हे देखील या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले. तर धनश्री सावंत ही जखमी झाली. कोकणे व सावंत कुटुंबीय पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मारूती युको मोटारीतून (एमएच ०३ एझेड-३११६) येत होते. पंढरपूरजवळ आले असतानाच समोरून येणाऱ्या एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघातग्रस्त एसटी बस इस्लामपूर आगाराची असून ती इस्लामपूरहून पंढरपूर व सोलापूरमार्गे अक्कलकोटकडे निघाली होती. जखमी धनश्री सावंत हिला वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.