News Flash

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजप अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपने बाजी मारली. निवडणुकीचे केलेले सूक्ष्म नियोजन, सरकार विरोधी वातावरण आणि प्रशांत परिचारक आणि अवताडे गटाचे मनोमीलन यामुळे भाजपचा हा विजय साकार झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली, तर भाजपने आवताडे यांना संधी दिली. पहिल्या फेरीपासून आवताडे यांनी आघाडी घेतली. सुरुवातीस ही आघाडी थोड्या मतांची असल्याने ही लढत अटीतटीची होणार असे वाटले. मात्र पुढील प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेत आवताडे यांनी अखेर ३७३३ मताधिक्क्याने विजय संपादन केला. आवताडे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

उमेदवार निवड महत्त्वाची

भारत भालके यांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्यासाठी भावनिक मुद्दा हा जमेचा होता. मात्र त्याच वेळी त्यांच्या उमेदवारीवरून पक्षात सुप्त विरोधही सुरू होता. या इच्छुकांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजूत काढावी लागली.  सुप्त अवस्थेत असलेल्या असंतोषाचा फटका भालके यांना बसला. तर दुसरीकडे भाजपकडून आवताडे यांची ही उमेदवारी ठरवतानाच आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटासोबत भक्कम मोट बांधल्याने त्यांची स्थिती भक्कम झालेली होती. यामुळेच तीन पक्षांची आघाडी असतानाही विजय मिळवण्यात आवताडे यशस्वी ठरले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा आहे,  सत्ताधाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेद, शक्ती आणि पैशाचा प्रचंड दुरुपयोग केला, पण जनतेने भाजपलाच कौल दिला. -देवेद फडणवीस, विरोधी पक्षनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:26 am

Web Title: pandharpur bjp won samadhan avtade akp 94
Next Stories
1 पंढरपुरात भावनिकतेपेक्षा असंतोष निर्णायक!
2 करोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!
3 प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे सांगलीत रुग्णांचा जीव टांगणीला
Just Now!
X