राष्ट्रवादी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

मंदार लोहोकरे, पंढरपूर

पंढरपूर : महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा, विविध आरोप या मुद्दय़ांवर भाजपने प्रचारात राळ उडविली असतानाच सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत राष्ट्रवादीने पंढरपूरची जागा कायम राखण्यासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेले आरोप-प्रत्यारोप, वेगवेगळ्या आश्वासनांमुळे पंढरीचा विठोबा कोणाला पावतो याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आमदार भारत भालके  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके  आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आदी दिग्गज नेते प्रचारात उतरले. भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी वातावरणनिर्मिती के ली. शिवसेनेच्या एक-दोन नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे वगळता कोणीच प्रचारात उतरले नाही. भाजपने सर्व यंत्रणा कामाला लावून शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार सुरू ठेवला असून या निवडणुकीत राज्य सरकारच्या विरोधात मतदान होईल अशी अपेक्षा भाजपने व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीने आपला गड कायम राखून विकासकामांना चालना देणार अशी भूमिका घेतली आहे.

भारत भालके  हे तीन वेळा तीन पक्षांमधून निवडून आले होते. त्यांचा जनसंपर्क  चांगला होता. याचाच फायदा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होण्यापासून अंतर्गत धुसफूस होती. तर भगीरथ भालके यांच्या नावाला पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करून पक्षातील वादळ शांत करण्यात यश मिळवले. भालके यांच्या विषयी असलेली सहानभूती, त्यांची मतदारसंघातील पकड या जमेच्या बाजू आहेत. पंढरपूर शहरातून जादाचे मताधिक्य मिळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली आहे. मंगळवेढा येथील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पुन्हा या निवडणुकीत दिले जात आहे. भगीरथ भालके यांनी प्रचारात तुमचा आशीर्वाद द्या अशी भावनिक साद घातली आहे.

भाजपने गेल्या वेळी अपक्ष लढून चांगली मते मिळविलेल्या समाधान आवताडे यांना रिंगणात उतरविले आहे. गेल्या वेळी भाजप आणि आवताडे यांना मिळालेली मते एकत्रित झाल्यास चित्र बदलू शकते. यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांची नाराजी दूर करण्यात आली आणि आवताडे व परिचारक यांना भाजप नेत्यांनी एकत्र आणले. आवताडे यांना मंगळवेढय़ात चांगली मते पडतील, तर पंढरपूरमध्येही परिचारक यांच्यामुळे चांगले मतदान होईल, असे भाजपचे गणित आहे.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बंद असल्याने शहर व आसपासच्या परिसराचे सारे अर्थकारणच बिघडले. आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही यात्रा झाल्या नाहीत. पंढरपूरमध्ये भाजपने या मुद्दय़ावर भर देत मतदारांना आवाहन के ले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निर्माण झालेली नाराजी, दोन मंत्र्यांचे राजीनामे, करोनामुळे झालेले नुकसान, वाढीव वीज बिले, आवकाळी पावसाने झालेले नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्दय़ांवर भाजपने महाविकास आघाडीला घेरले आहे. सरकार काय बदलणार नाही मग भाजपला मत देऊन फायदा काय, असा सवाल राष्ट्रवादीकडून के ला जात आहे. शेवटच्या दोन दिवसांत आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची जास्त शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे सरकार विविध आरोप आणि चौकश्यांमुळे चांगलेच बदनाम झाले. त्यातच करोनाचे संकट वाढत आहे. टाळेबंदीचे संकट आहेच. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये महाविकास आघाडी किं वा राष्ट्रवादीला धक्का देऊन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण आहे हे अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.