देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पंढरपुरात बंद पुकारण्यात आला आहे. या वेळी मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक व विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. एकादशी असतानाही येथील व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध भागातून हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चामध्ये हजारो महिला व पुरूष सहभागी झाले होते. पंढरपूर शहरातील आमदार परिचारक यांच्या घराला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भोसे येथे आयोजित सभेत आमदार परिचारक यांनी भारतीय जवानांच्या चारित्र्यावर शंका घेत बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रतिकूल पडसाद उमटल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. परंतु, त्यानंतरही हा विरोध न मावळता राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. आज पंढरपूर शहरात विविध संघटना व माजी सैनिकांनी एकत्र येत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. प्रारंभी सर्वजण शहरातील शिवाजी चौकात जमा झाले. मोर्चात सामील झालेल्या माजी सैनिकांनी परिचारक यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर शहरातील शिवाजी चौक, सावरकर पुतळा, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक असा मोर्चा काढण्यात आला. आमदार परिचारक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल कारंडे यांना आंदोलकांनी दिले.
आज एकादशी असल्याने पंढरपुरात राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा व्यवसाय चांगला होत असतो. परंतु, याकडे दुर्लक्ष करत व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान, आमदार परिचारक यांच्या पंढरपूर शहरातील घराला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. आमदार परिचारक हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत.