News Flash

पंढरपुरात सोमवारी उद्धव ठाकरेंची महासभा, शिवसेनेची जय्यत तयारी

पंढरपुरात २०० स्वागत कमानी, १० हजार झेंडे, २०० डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यासाठी सुमारे १ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा देत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची अयोध्यानंतर पंढरपुरात सभा होणार आहे. सोमवारी म्हणजे (दि. २४) येथील कॉलेज रोडवरील चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानात दुपारी सभा होणार आहे. या सभेसाठी जागोजागी लावण्यात आलेले भगवे झेंडे, स्वागत कमानींमुळे पंढरी नगरी भगवीमय झाली आहे. या सभेच्या तयारीसाठी सेनेचे खासदार संजय राउत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आदींसह पक्षाचे अनेक खासदार, आमदार पंढरीत दाखल झाले आहेत. सोमवारी ठाकरे यांची दुपारी सभा आणि त्यानंतर सायंकाळी चंद्रभागा नदीवर आरती होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राम मंदिर हा मुद्दा घेवून अयोध्येतील सभेनंतर राज्यात पंढरपूर येथे शिवसेनेने सभेचे आयोजन केले आहे. राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करणे हा विचार घेवून सोमवारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पुणे-पंढरपूर रस्त्यावरील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाजवळील चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून या सभेला जवळपास ५ लाख शिवसैनिक येतील असा अंदाज पक्षाने केला आहे. तर दुसरीकडे शहरात २०० स्वागत कमानी, १० हजार झेंडे, २०० डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यासाठी सुमारे १ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. सोमवारी सभा झाल्यावर चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील इस्कॉन मंदिराने बांधलेल्या घाटावरून उद्धव ठाकरे नदीची आरती करणार आहेत.

महासभेसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने खोचला ‘पदर’
ठाकरे यांच्या महासभेसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणीनी ‘पदर’ खोचला आहे. या सभेला महिलांची व्यवस्था आणि सभेला महिलांची उपस्थिती ठेवण्यासाठी सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना घाडी ठाण मांडून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि मोठ्या गावामध्ये महिलांचे मेळावे आणि भेटीगाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 10:30 pm

Web Title: pandharpur shiv sena mahasabha uddhav thackeray rally
Next Stories
1 सिन्नर शिर्डी रस्त्यावर साईभक्तांचा अपघात, ४ ठार
2 ‘अवनी’चा एक बछडा वनविभागाकडून जेरबंद
3 साताऱ्यातच माझ्या शत्रुंची भली मोठी फौज, रामराजेंचा उदयनराजेंना टोला
Just Now!
X