देशात सर्वत्र करोना थैमान घालत आहे. राज्यातदेखील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पंढरपूर याला अपवाद ठरला आहे. पंढरपूरचे प्रांताधिकार, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी सुरुवातीपासून योग्य नियोजन, समन्वय आणि नियमाचे काटेकोरणे पालन करून करोना मुक्तीचा नवा ‘पंढरपूर पॅटर्न’ तयार केला आहे.

करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सध्या सर्वत्र जोमाने प्रयत्न सुरू आहेत. देशात टाळेबंदी पुकारल्यापासून ते आजपर्यंत पंढरपूर करोनामुक्त आहे. येथील प्रशासनाने सुरुवातीपासून नागरिकांना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले. जीवनावश्यक वस्तू, किराणा, भाजीपाला घरपोच करण्याची व्यवस्था केली. शहरात मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई, गांधीगिरी केली. शहरात सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण केले. त्याच वेळी घरोघरी वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर सारीची माहिती गोळा केली. तसेच घरोघरी थर्मल चाचणी केली. ज्यावेळस इतर शहरात रुग्ण वाढत होते त्यावेळेस तालुक्यातील प्रशासनाने या सर्व बाबी अतिशय तातडीने आणि नियोजनबध्द कार्यक्रम राबवून पूर्ण केल्या. शहरात तीन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता आणि तो १०० टक्के यशस्वी झाला.

पंढरपूरच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात याबाबत सुरुवातीला प्रबोधानाचे काम प्रशासनाने केले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या माहितीपासून ते सोयी सुविधेबाबत सर्व माहिती प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले. यात आशा वर्कर्स ते प्रातांधिकारी यांचा एक गट स्थापन केला. तसेच ग्रामीण भागातील जनतेला कोणत्याही कामासाठी शहरात यायला लागू नये याची खबरदारी घेतली. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने तालुका आणि शहरात येणारे रस्ते बंद केले. जागोजागी तपासणी नाकी उभारून येजा करणाऱ्यांची २४ तास तपासणी सुरू केली. ग्रामीण भागातील जवळपास ८० टक्के गावांनी ३ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ पुकारून तो १०० टक्के यशवी करून दाखवला. आता परजिल्ह्यातील माणसे यत आहेत. या साठी शहरात वार्ड समिती तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून घरी आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवणे, त्याची आरोग्य तपासणी आदी माहिती घेतली जाणार आहे.

याचबरोबर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासनाला साथ दिली. प्रशासनाच्या सूचना, आवाहन याला प्रतिसाद देत प्रशासनाच्या बरोबरीने राहून करोनामुक्त तालुका राहिला. मात्र याच वेळी मोहोळ तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी पंढरपूर शहरात एका रुग्णालयात दाखल झाली होती.त्या महिलेची प्रकृती खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. ती महिला करोनाबाधित झाली. त्यानंतर अवघ्या ३६ तासांत त्या महिलेच्या संपर्कातील आणि त्यांच्या संपर्कातील असे जवळपास १२००  व्यक्तींची यादी तयार केली. त्यातील पहिल्या संपर्कातील ४९ व्यक्तींना विलगीकरण कक्षात  ठेवले. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या सुदैवाने सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. असे असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सोलापूर शहरात मात्र भीषण परिस्थिती आहे. सोलापूर शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. जर सोलापूर शहर करोनामुक्त करायचे असेल तर ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवावा अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.

पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, निमा संघटना आदी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच ग्रामीण भागातही यंत्रणा सतर्क राहिल्या आहेत. ग्रामीण भागातील अर्थकारण सुरळीत राहील यावर भर दिला आहे. इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरात विलगीकरण केले आहे. त्यांनी सर्व नियम पाळावे. आतापर्यंत नागरिकांनी साथ दिली आहे. पुढील काही दिवस सरकारच्या नियमांचे पालन करू. मास्क लावणे, योग्य अंतर राखणे आणि घराबाहेर न पडणे हे केले तरच करोनाची लढाई जिंकू.

– सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर